विधानसभेची निवडणूक केव्हा होईल हे अद्याप स्पष्ट नाही; मात्र चिपळूण विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आमदार शेखर निकम यांच्यासाठी २०२४ ची विधानसभा निवडणूक सोपी मानली जात होती; मात्र गुहागरचे आमदार भास्कर जाधव मतदार संघात सक्रिय झाल्यामुळे चुरस निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आमदार निकम यांचा विधानसभेचा पेपर सोपा राहिलेला नाही, अशीच चर्चा आहे. आमदार शेखर निकम यांनी २०१९ च्या निवडणुकीत तब्बल २९ हजार ५९५ मतांनी विजयी झाले. त्या अगोदर लोकसभा निवडणुकीत. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना ५७ हजार २३३ एवढे मताधिक्य मिळाले.
त्यातील दहा ते पंधरा हजार मते कमी झाली तरी किमान तीस ते चाळीस हजाराचे मताधिक्य कायम राहील, असा शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांना अंदाज होता; मात्र शेखर निकम यांनी लोकसभेतील ५७ हजारांचे मताधिक्य तोडून २९ हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला. यावरून निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनाचा अंदाज बांधता येतो. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत शेखर निकम पुन्हा सहज निवडून येतील, असे सर्वांना वाटत होते. शेकडो कोटीची कामे मतदार संघात आल्यामुळे कार्यकर्तेही आनंदी होते.
राज्यात भाजपविरोधी हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर विद्यमान आमदार निकम यांना महाविकास आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी मिळेल. ते भाजपच्या विरोधात लढले तर सहज निवडून येतील; मात्र महाविकास आघाडी झाली नाही तरच शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे सेनेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची अडचण झाली होती; मात्र सव्वा वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे दोन पक्ष अस्तित्वात आले. अशीच स्थिती आता राष्ट्रवादीत निर्माण झाली आहे. ठाकरे सेनेकडून भास्कर जाधव यांनी विद्यमान आमदार निकम यांच्याविरोधात तयारी सुरू केली आहे. जाधव यांनीही गुहागर विधानसभा मतदार संघात निर्माण केलेले वर्चस्व पाहता ही निवडणूक चुरशीची होईल, असेच चित्र दिसत आहे.