सामाजिक भान ठेवून समाजभावी संस्था काम करतात. शिक्षण आणि सुविधा यामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. प्रयत्न करणारे प्रामाणिक असतात तेव्हा अशा प्रकारची वसतिगृहे उभी राहतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका तेथे कुणबी भवन बांधण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलुंड येथील कुणबी समाजोन्नती संघाच्या कुणबी विद्यार्थी वसतिगृहाच्या लोकार्पणप्रसंगी केले. मुंबईत रंगलेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे आदी उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर मुंबई येथील कुणबी बांधव उपस्थित होते. वसतिगृह उद्घाटनासाठी सर्व कार्यकारिणी सदस्य, प्रतिनिधी मंडळ सदस्य, सर्व तालुका विभागीय शाखा पदाधिकारी कुणबी युवा मंडळ, महिला मंडळ, राजकीय संघटन समिती बळीराज सेना पदाधिकारी यांनी खूप परिश्रम घेतल्याने कुणबी समाजबांधवांची प्रचंड उपस्थिती लाभली. छत्रपती संभाजी मैदान, मुलुंड येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये जेवढा वाटा सरकारचा तेवढाच वाटा आपल्यासारख्या सेवाभावी संस्थांचा आहे.
ही संस्था शिक्षण, रोजगार, उद्योग यासाठी पाठबळ देत आहे. ओबीसी बांधवांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योग करायचा आहे. त्यांचा व्याज परतावा सरकार भरेल, हा निर्णय घेतला आहे. ७२ वसतिगृहापैकी ५२ वसतिगृहे याच महिन्यात चालू होत आहेत. परेलच्या वास्तूला निधी दिला जाईल. ओबीसी बांधवांसाठी १० लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे.