उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खेडच्या कारभाराची चौकशी करून दोषर्षीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी आमदार योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आमदार योगेश कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दापोली विधानसभा मतदार संघांतर्गत येणाऱ्या खेड तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारात फार मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आपणाकडे आल्या आहेत. त्यामध्ये नियमबाह्य पद्धतीने एका दिवसात मोजणी करणे, अभिलेख गहाळ तसेच अनेक मोजणी प्रकरणांमध्ये खाडाखोड करून शासकीय दस्तऐवजामध्ये फेरबदल करणे तसेच अतितत्काळ मोजणी प्रकरणात ठराविक कालावधी पूर्ण होण्याअगोदरच मोजणी केल्याची उदाहरणे आहेत.
एकाच नंबरवरून अनेक मोजण्या करून शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवलेला आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रारी दिल्या आहेत. या कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यामध्येदेखील तक्रारी नोंद झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडूनसुद्धा याबाबत तक्रारी आल्या आहेत. या संदर्भात चौकशीदेखील झाली आहे; मात्र दोषींवर कारवाई होत नसल्याने उपाधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय खेड रत्नागिरी येथे चाललेल्या अनागोंदी व अनियमित कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे आमदार योगेश कदम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.