लांजा तालुक्यातील साधारण तीन वर्षांपूर्वी घडलेली हि घटना आहे. अखेर त्याला न्याय मिळाला. वाडिलिंबू येथे बाजारातून सामान आणण्यासाठी गेलेले असताना दारुच्या नशेत चुलत भाऊ मनोहर महादेव गोरे २६, रा.वाडिलिंबू सापुचेतळे, लांजा याला मारहाण केली. त्यानंतर गॅस सिलेंडवर त्याचे डोके आपटून त्याला चालत्या गाडीतून ढकलून देत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्या दोन चुलत भावांना न्यायालयाने मंगळवारी ७ वर्षांचा सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
कौस्तुभ रामचंद्र गोरे वय ३४, रोहन भागेश गोरे वय २४, दोन्ही रा.वाडिलिंबू सापुचेतळे, लांजा, रत्नागिरी अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. १४ सप्टेंबर २०१८ रोजी हे तिघेही कौस्तुभ गोरेच्या चारचाकी गाडीतून एमएच-०८-आर-७१३२ दुकानातील सामान आणि रोहन गोरेचा सिलेंडर आणण्यासाठी लांजा येथे गेले होते. सर्व सामान घेतल्यानंतर तेथीलच एका दारुच्या दुकानात दारु पिऊन ते परत येत होते.
पुनस पर्यंत आले असता मनोहरने बिअरची बाटली कौस्तुभ आणि रोहनच्या अंगावर ओतली. याचा राग आल्याने कौस्तुभने गाडीतून खाली उतरत मनोहरला मारहाण केली व ते पुन्हा घरी जाण्यास निघाले. पुढे गेल्यावर सायंकाळी ४.३० च्या सुमारास आगरगाव पांढरा आंबा येथील वळणावर कौस्तुभने मनोहरला मारहाण करुन गाडीत ठेवलेल्या गॅस सिलेंडरवर त्याचे डोके जोरात आपटले. त्यामुळे मनोहरच्या डोक्याला गंभीर दुखापत करुन त्याला चालत्या गाडीतून ढकलून दिले.
त्यानंतर दोन्ही आरोपींनी अपघात झाल्याचा बनाव करुन पुरावा नष्ट केला. रस्त्यात जखमी अवस्थेत पडलेल्या मनोहरला आपण जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केल्याचा बनाव त्यांनी रचला होता. उपचारा दरम्यान मनोहरचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करुन अधिक तपासासाठी प्रकरण लांजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.