लांजा तालुक्यातून कर्नाटक येथे अवैध रित्या गुरे वाहतुक करून घेऊन जाणाऱ्या टोळक्याला राजापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करत जेरबंद केले आहे. रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास ओणी-पाचल मार्गावर हि घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी विवेक शामराव कांबळे वय ४१, प्रणव उर्फ रोहित अजित कांबळे वय २३ दोघेही रा. पडलिहाळ, ता.निपाणी, जि.बेळगांव तसेच तबरेज चांदमियाँ ठाकुर व चांदमियाँ अब्बास ठाकुर रा.परटवली ता.राजापूर यांना अटक केली आहे. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे.
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन वीर यांना ओणी ते पाचल या रोडने एका चार चाकी गाडीतून लांजा येथून निपाणी जि.बेळगाव येथे कत्तलीसाठी गुरे घेवून जाणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला होता. ओणी-पाचल अशी पेट्रोलिंग करीत असताना १०.१५ वा.चे दरम्यान ओणी दैतवाडी गणेश मंदिर येथून काळ्या रंगाची इंडिगो गाडी व त्याच्या मागून एक महेंद्रा जिनिओ गाडी के.एम.एच.०४/एफपी/६४२४ ही भरधाव वेगामध्ये पाचल दिशेला जात असताना नजरेस पडली.
त्यावेळी दोन्ही गाड्यांना थांबण्याचा इशारा दिला असता सदर दोन्ही गाडी वरिल चालकाने गाडी न थांबवता गाडी पुढे पाचलच्या दिशेने घेवुन निघाले. महेंद्रा जिनिओ गाडीचा हौदा कापडाने झाकलेल्या स्थितीत असल्याने, सदर गाडीवर अजूनच संशय दटावला. पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवत पुढे जावुन काही अंतरावर सौंदळ पाटीलवाडीचे जवळ वळणावर गाड्या अडविल्या.
यावेळी पोलिसांनी गाड्यांची तपासणी केली असता गाडीच्या हौद्यामध्ये १ बैल व ७ गायी मर्यादिपेक्षा जास्त प्रमाणात बसवून त्यांना आखुड दोरीने बांधून व कोंबुन भरून निपाणी येथे कत्तलीसाठी घेवून जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.