लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक या रासायनिक कारखान्याचे व्यवस्थापन अखेर लोटे पंचक्रोशीच्या एकजुटीसमोर नमले असून स्थानिक बेरोजगार तरूणांना कारखान्यामध्ये रोजगार देण्यास तयार झाले आहे. लोटेतील उद्योग भवन येथे लक्ष्मी ऑरगॅनिकचे व्यवस्थापन आणि लोटे पंचक्रोशीतील नागरिक व पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत स्थानिक तरूणांना कारखान्यामध्ये रोजगार देण्यास तयार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून कळवण्यात आले आहेत.
लोटे औद्योगिक वसाहत घडणारे अपघात आणि स्थानिकांचे रोजगार या विषयामध्ये कायमच चर्चेत आहे. ही औद्योगिक वसाहत निर्माण होण्यासाठी लोटे पंचक्रोशीतील शेतकर्यांनी आपल्या शेतजमिनी अत्यंत कमी भावाने शासनाला विकल्या. उद्योगधंदे आल्यानंतर परिसराचा विकास होईल, भविष्यात आमच्या मुलाबाळांना रोजगार मिळेल या केवळ माफक अपेक्षेने जमिनी देवून रोजगाराची वाट पाहत बसले. मात्र या औद्योगिक वसाहतीमध्ये बरेचशे कारखाने आणि त्यांचे व्यवस्थापन स्थानिक बेरोजगार तरूणांना डावलून परस्पर परजिल्ह्यातील तसेच परप्रांतीय तरूणांना कारखान्यात सामावून घेत आहेत, असाच प्रकार लक्ष्मी ऑरगॅनिक या कारखान्याबाबत ही घडला आहे.
सलग दीड ते दोन वर्षे पंचक्रोशीतील स्थानिक स्वराज्य संस्था व कारखान्याकडे संपर्क साधून पत्रव्यवहार करून स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत विनंती व आवाहन करत असताना या कारखान्याच्या व्यवस्थापनाने अलिकडेच परजिल्ह्यातील तब्बल ५८ तरूणांना कारखान्यामध्ये रोजगार देवून स्थानिक स्वराज्य संस्थांना व स्थानिक बेरोजगार तरूणांना डालवण्याचे काम केले आहे. ही बातमी पंचक्रोशीत समजताच दोन दिवसांपूर्वी पंचक्रोशीतील संतप्त बेरोजगार तरूण, नागरिक व पदाधिकारी कारखान्यावर धडकले आणि कारखाना व्यवस्थापनास याबाबत जाब विचारला. मात्र आम्हाला दहा वर्ष अनुभव असलेले उमेदवार तसेच बी.टेक., एम. टेक. उमेदवार हवे आहेत. ते तुम्ही देवू शकता का? असे सांगून कारखाना व्यवस्थापनाकडून स्थानिकांच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला गेला.
यावर पंचक्रोशीतील नागरिक संतप्त झाले आणि कारखाना उभा राहण्यासाठी आमच्या स्थानिक बेरोजगार तरूण अनुभव घेण्यासाठी इतर औद्योगिक वसाहतीत जाणार का, असा सवाल पंचक्रोशीतील नागरिकांकडून करण्यात आला.