तालुक्यातील वेरवली येथील बेर्डेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गळती लागली असून, या कालव्यातून झिरपणारे पाणी नजीक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीत घुसून भातशेतीच्या मशागतीसाठी एकत्र ठेवलेले सर्व साहित्य भिजून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी वेरवली गुरववाडी येथील ग्रामस्थांनी सरपंच आणि तहसीलदारांना निवेदन दिले आहे. वेरवली बुद्रुक येथील बेर्डेवाडी धरण प्रकल्पाचा डावा कालव्यातून पाणी सोडले जात आहे. उजवा कालवा बंदिस्त आहे; परंतु डाव्या कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी हे चार किलोमीटरच्या पुढे जात नाही. ठिकठिकाणी कालव्याला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी झिरपून ते गुरववाडीतील शेतकऱ्यांच्या शेतीत घुसत आहे.
डाव्या कालव्यातून झिरपणारे पाणी हे भातशेतीमध्ये साचल्यामुळे मशागतीसाठी एकत्र करून ठेवलेले सर्व साहित्य भिजले आहे. तसेच सध्याचा पाणीसाठा बघता पावसाळी हंगामातसुद्धा भातशेती करू शकत नाही. त्यामुळे शेतकन्यांचे नुकसान होणार आहे. संबंधित खात्याकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ दीपक गुरव, अशोक गुरव, शांताराम गुरव, रघुनाथ गुरव आदींनी केली आहे.
नुकसानभरपाई मिळावी – तालुक्यातील वेरवली येथील बेर्डेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला गळती लागली आहे. त्या कालव्यातून झिरपणारे पाणी आसपासच्या शेतजमीनीत घुसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.