कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातील टप्पा १ आणि २ ला पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्याची गळती काढली जाणार आहे. सध्या गळती काढण्याचे प्रात्यक्षिक सुरू असल्यामुळे पोफळी परिसरातील चार गावांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. वीजनिर्मिती कंपनीच्या कर्मचारी वसाहतीतही पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी जुन्या विहिरी उपसण्यास सुरुवात केली आहे. विहिरींच्या स्वच्छतेसह गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ केले जात आहेत. कोयना धरणातून पोफळी येथील वीजनिमिर्ती संचाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोगद्याची गळती काढली जाणार आहे. या कामासाठी वीज महानिर्मिती कंपनीने निधीची तरतूद केली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया झाली होती; मात्र काम कधी सुरू होईल, हे निश्चित सांगितले जात नव्हते. गळती वाढत असल्यामुळे यावर्षी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम प्रात्यक्षिक घेतले जात आहे. त्यामुळे एक ते पाच नोव्हेंबरदरम्यान वीजपुरवठा बंद ठेवला आहे. पोफळी ईव्हीटी येथून पोफळी गावासह वीजनिर्मिती कंपनी कर्मचारी वसाहत, कोंडफणसवणे, मुंढे आणि शिरगाव गावाला ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा केला जातो.
टप्पा एक आणि दोनची वीजनिर्मिती बंद असल्यामुळे कोयनेतून टप्पा एक आणि दोनकडे येणारे पाणी थांबवण्यात आले आहे. त्यामुळे या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा बंद करण्यापूर्वी महानिर्मिती कंपनीने संबंधित गावांना पत्र पाठवून पूर्वकल्पना दिली होती. शिरगावच्या सरपंच नीता शिंदे आणि मुंढेचे सरपंच सखाराम गायकवाड यांनी ग्रामसभा घेऊन पाणीपुरवठा बंद करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मागितली होती; परंतु कंपनीला पुढील कार्यवाही करायची असल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रात्यक्षिक घेण्याचे ठरले. त्यानंतर ग्रामस्थांनी जमेल त्या पद्धतीने पाणी साठवून ठेवले; मात्र पाण्याची गरज वाढल्यामुळे साठवलेले पाणी दोन दिवसांनंतर संपले. त्यामुळे आता गावातील विहिरी स्वच्छ केल्या जात आहेत. नैसर्गिक स्त्रोत स्वच्छ केले जात आहेत. काही गावात जुने पंप दुरुस्त केले जात आहेत; मात्र चारही गावांमध्ये ग्रॅव्हिटीची पाणी योजना सुरू झाल्यानंतर जुन्या पंपाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी देणे अशक्य झाले आहे.

