गुहागर मतदारसंघात माझ्या विरोधात कोणीही उमेदवार येऊदे, ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करेन त्याच दिवशी माझा विजय निश्चित असेल. ‘हा अहंकार नसून माझा माझ्या जनतेवरचा ठाम विश्वास आहे. आशा शब्दात शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या विजयाची खात्री व्यक्त केली आहे. अद्याप तरी माझ्या समोर कोणच पेहलवान दिसत नाही. त्यामुळे उगाच जोर बैठका का काढू, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आम. जाधव चिपळूणमध्ये दाखल झाले असून त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देखील निश्चित झाली आहे. गुरुवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी आपल्या विजयाबरोबरच अन्य अनेक राजकीय विषयावर दिलखुलासपणे आपली मते मांडली. ते म्हणाले गेले १५ वर्षाहून अधिक काळ मी गुहागर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
येथे काम करताना पक्ष भेद, जातीभेद आशा गोष्टींना मी थारा दिलेला नाही. तसेच विकास कामे करताना देखील कोणी मला मते दिली, नाही दिली, कोणती वाडी, गाव कोणत्या पक्षाकडे असे अजिबात न करता फक्त विकास हाच अजेंडा मी येथे राबवला आहे. खोटी आणि आवास्तव आश्वासने न देता जे शक्य आहे तेच आश्वासन द्यायचे आणि ते पूर्ण करायचे हे मी कसोशीने पाळले आहे. दिलेली वेळ मी कधीच चुकवत नाही. आणि दिलेले आश्वासन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ ही बसत नाही. त्यामुळे जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास राहिला आहे. वर्षातून तीनदा मी प्रत्येक गावात जातो. दिलेली आश्वासने पूर्ण झालीत की नाही याचा आढावा मी स्वतः घेतो, एखादे काम झालेले नसेल तर का झाले नाही त्याचे कारण शोधून पाठपुरावा करतो ही माझ्या कामाची पद्धत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात सर्वसामान्य जनतेशी माझा संपर्क देखील राहिला आहे, असेही ते म्हणाले.
शासन आपल्या दारी हे आताचे सरकार योजना घेऊन बोंबलत आहे. परंतु मी मंत्री असताना माझ्या मतदारसंघात सर्वप्रथम मी शासन आपल्या दारी हे राबवून दाखवले होते, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, इतकेच नव्हे तर उपयुक्तांना बरोबर घेऊन मी मतदारसंघात फिरून त्याच ठिकाणी कामे मार्गी लावण्याचे काम मी केलेले आहे. त्यामुळे शासन आपल्या दारीचा बागुलबुवा या सरकारने माझ्या समोर तरी करूच नये, असेही आम. जाधव म्हणाले.