गोधन व गोशाळा वाचवण्यासाठी संचालक भगवान कोकरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला ९ दिवस झाले तरीदेखील कोणीच दखल घेत नसल्याने अस्वस्थ झालेल्या भगवान कोकरे यांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून संताप व्यक्त करतानाच खंत आणि वेदना देखील व्यक्त केल्या आहेत. या उपोषणात माझा बळी गेल्यानंतर तरी गोशाळा वाचवा व गोधनाचे संरक्षण करा, अशी हतबल याचना त्यांनी पत्रातून केली आहे. दरम्यान मंगळवारी संध्याकाळी बाहेर गायी महामार्गावर सोडून दिल्या परंतु पोलिसांनी गायीना अडवले व भगवान कोकरे यांच्यासह काही वारकरी मंडळींना ताब्यात घेतले.अनुदान द्यावे लोटे येथील गोशाळेचे उर्वरित २५ लाख अनुदान सरकारने द्यावे तसेच गोशाळेसाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी संचालक भगवान कोकरे यांनी उपोषण सुरू केले असून या उपोषणाला आता ९ दिवस पूर्ण झालेले आहेत. या काळात उपोषणकर्ते भगवान कोकरे यांची प्रकृती प्रचंड खालावली असून चिंताजनक बनत चालली आहे. तर सशक्त आहारा अभावी गोशाळेतील जनावरे देखील दगावली आहेत. पशुसंवर्धन विभाग गोशाळेतील जनावरांची काळजी घेत असला तरी भगवान कोकरे यांच्या उपोषणाकडे मात्र अद्याप तरी कोणी फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी आता टोकाची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
रक्ताने लिहिले पत्र – सरकारमधील एकाही मंत्र्याने किंवा लोकप्रतिनिधीनी उपोषणाची दखल न घेतल्याने भगवान कोकरे यांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. पत्रामध्ये त्यांनी गोशाळेची सद्यपरिस्थिती विषद करताना आपले सरकार गोमातेला मानणारे, आदर करणारे असले तरी गेले कित्येक दिवस पत्रव्यवहार करून देखील या गोशाळेकडे लक्ष दिलेले नाही. आपल्याला भेटण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला परंतु अफाट गर्दी व आपल्या भोवती असलेल्या बडव्यांनी वारकरी संप्रदायाला विठ्ठलाला भेटू दिले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना भगवान कोकरे म्हणाले की, लाखोंच्या सभा घेऊन त्याच्यावर कोट्यावधी खर्च करण्यास सरकारकडे व लोकप्रतिनिधीकडे पैसा आहे. मात्र गोधनाला चारा मिळावा त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून कोणाकडेच पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर देखील त्यांनी खरमरीत शब्दात टीका केली.
..आणि गायी दिल्या सोडून – पत्रकार परिषद संपल्यानंतर भगवान कोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोशाळेतील गायी रस्त्यावर सोडून दिल्या. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी महामार्गावर जाणाऱ्या गायीना रोखून धरले आणि भगवान कोकरे तसेच काही वारकरी मंडळींना ताब्यात घेतले. यावेळी जोरदार गोंधळ उडाला होता.