खेड नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेली कर्मचारी वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. शहराची स्वच्छता राखणारे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे कर्मचारी असुरक्षित, धोकादायक आणि जीवघेण्या निवासस्थानात राहत आहेत. वसाहतीतील प्रत्येक घराची स्थिती पाहून अंगावर काटा येतो. भिंती आणि पाया अजून कसेबसे टिकून आहेत; पण छप्पर इतके जर्जर झाले आहे की, कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. रोजच पावसाळ्यात छपरातून गळणारे पाणी, तडे गेलेल्या भिंती आणि पडणारे प्लास्टर हे या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनले आहेत. तरीसुद्धा प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
या वसाहतीत राहणारे सफाई कर्मचारी, गटारे साफ करणारे, रस्त्यांवर झाडू मारणारे आणि इतर तळागाळातील कामगार ‘शहरासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे योद्धे’ आहेत, पण त्यांच्या सुरक्षिततेकडे नगरपालिका प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनीही या स्थितीवर संताप व्यक्त केला असून, खेड नगरपालिकेने तत्काळ तांत्रिक पाहणी करून या वसाहतीची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे अन्यथा येत्या काळात कर्मचारी संघटना आणि सामाजिक संस्था तीव्र आंदोलन उभारतील, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू – वसाहतीच्या नूतनीकरणाच्या अनुषंगाने अंदाजपत्रक बनवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते झाल्यानंतर तांत्रिक मंजुरी आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर या वसाहतीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.