रत्नागिरीतील गणपतीपुळे देवस्थान सर्वदूर प्रचलित आहे. अनेक पर्यटक दरवर्षी इथे दाखल होत असतात. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाने सर्व धार्मिक स्थळांवर बंदी आणली आहे. त्यामुळे मागील वर्षापासून देव देवळामध्ये बंद आहे. स्थानिक नागरिकांचे उत्पन्न हे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असते.
रत्नागिरीतील सध्याची कोरोनाची स्थिती कमी अधिक प्रमाणात सुधारताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध हळूहळू शिथिल होताना दिसत आहेत. जिल्हा स्तरावरील असलेली बंदी देखील उठविण्यात आली आहे. पण सध्या चर्चा सुरु आहे ती गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराची ! रत्नागिरी जिल्हाबंदी शासनाने उठविली असताना, ग्रामपंचायतीने मात्र परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना गणपतीपुळे परिसरातील लॉजिंग उपलब्ध करून दिल्यास, लॉजिंग मालकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात येईल असे जाहीर केले आहे.
रत्नागिरी चौथ्या टप्प्यात अनलॉक झाली असून, जिल्हा बंदी उठवण्यात आली असून, परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्थेसाठी ग्रामपंचायत रोख लावत आहे. एकतर मागील वर्षभर काहीही उत्पन्नाचे साधन नसताना, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर व्यवसाय सुरु करण्यात येत असताना गणपतीपुळे ग्रामपंचायतीने काढलेल्या या फतव्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण जिल्हाधिकार्यांनी लॉजिंग व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे लॉजिंग व्यवसाय सुरु करण्याचे शासकीय आदेश जोपर्यंत प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत कोणीही पर्यटकांना राहण्यास खोली उपलब्ध करून देऊ नये. कायदाभंग केलेला निदर्शंस आल्यास, संबंधितांवर १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल अशी सर्व गणपतीपुळ्यातील लॉजिंग व्यावसायिकांना बजावण्यात आले आहे. जिल्हा बंदी उठल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचे कमी झालेले प्रमाण वाढीस लॉजिंग व्यवसाय जबाबदार ठरू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.