एका निमशासकीय वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळवून देण्याचा बहाणाकरत एक टोळी राजापूर तालुक्यात सक्रिय झाली आहे. या टोळीने पाचल मधील गरजू महिलांकडून लाखो रुपये जमा केल्याचे वृत आहे. पाचल ग्रामपंचायत सदस्या दर्शना जाधव यांनी ही बाब सरपंचांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या टोळीला बोलवून विचारणा केली असता आपण कोणत्याही वित्तीय संस्थेशी संबंधित नसल्याचे मान्य केले. त्यामुळे कर्ज प्रकरण मंजूर करुन देतो म्हणून फिरणाऱ्या टोळीचे पितळ उघडे पडले आहे. उद्योग व्यवसायासाठी कार्यरत असलेल्या एका निमशासकीय वित्तीय संस्थेकडून व्यवसाय करण्यासाठी ५ ते १५ लाख रुपये कर्ज आणि त्यामध्ये २ लाख सबसिडी मिळवून देण्याच्या अमिषाने राजापूर तालुक्यातील ओणी आणि पाचल विभागात एक टोळी गेले काही दिवस सक्रिय झाली होती.
सदस्य होण्यासाठी सुरूवातीला ५ हजार रुपये मागितले जात होते. पाचल येथील मुस्लिम वाडी, बौध्द वाडी येथील महिलांची मिटिंग घेतल्या गेल्या. महिलांची कर्ज प्रकरण आणि सोबत ५ हजार रुपये जमा करण्यासाठी पाचल आणि सौंदळ येथील महिलांची नेमणूक करण्यात आली. निमशासकीय वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी फिरणाऱ्या टोळी बाबत पाचल ग्रामपंचायत सदस्या दर्शना जाधव यांना संशय आल्याने महिलांची फसवणूक थांबवण्यासाठी पाचल सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पत्रकार तुषार पाचलकर यांच्या लक्षात आणून दिले. त्या नंतर पाचल ग्रामस्थांची होणारी फसवणूक थांबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
या टोळीला ग्रामपंचायत मध्ये दि. ३ रोजी बोलवून घेतले. त्यानुसार तीघे जण पाचल ग्रामपंचायत कार्यालयात आले. त्यावेळी दर्शना जाधव, तुषार पाचलकर आदी उपस्थित होते. तुषार पाचलकर, दर्शना जाधव यांनी टोळीचा पाडा सरपंच यांच्या समोर मांडला. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याचा निमशासकीय वित्तीय संस्थेशी कोणत्याही संबंध नसल्याचे समोर आले. आपण कर्ज प्रकरण ऑनलाईन करण्याच काम करतो असे सांगितल्याने त्यांचे पितळ उघडे पडले. दरम्यान, निमशासकीय वित्तीय संस्थेशी संपर्क साधला असता, संबंधितांशी आमचा संबंध नसल्याचे सांगण्यात आले.