25.6 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeDapoliदापोलीत पर्यटनासह मच्छीमारांचे ५० कोटींचे नुकसान

दापोलीत पर्यटनासह मच्छीमारांचे ५० कोटींचे नुकसान

७ मेपासून युद्धजन्य परिस्थितीचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला.

जिल्ह्यात २० मेपासून आजपर्यंत वादळीवाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. या कालावधीत होणारी कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. साधारण एप्रिलमध्ये मुलांच्या परीक्षा आटोपल्या की, मे महिन्यात दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची चांगलीच गर्दी होते. ७ मेपासून युद्धजन्य परिस्थितीचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला. त्यावेळी काही हॉटेलमधील बुकिंग पर्यटकांनी रद्द केली; परंतु युद्ध थांबल्यावर पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाली. किनारे पर्यटकांनी फुलून गेले. परिस्थिती निवळत असतानाच मॉन्सूनपूर्व पावसाने तोंड वर काढले. शासनाच्या नियमानुसार, १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी असते तर सागरी जलपर्यटन २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीसाठी बंद केले जाते. त्यामुळे मे महिना दोन्ही व्यावसायिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो; परंतु यंदा हंगाम संपण्यापूर्वीच पावसाने सर्वांचीच मोठी निराशा केली. पावसामुळे हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला.

पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाल्याने साठवण करून ठेवलेले मासळी, मटण, चिकन, आईस्क्रीम व अन्य दुग्धजन्य पदार्थांचेही नुकसान झाले. त्यामुळे यंदा पर्यटन व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हंगामाअखेरीस मच्छीमार पावसाळ्याची बेगमी करून ठेवण्यासाठी अखेरच्या टप्प्यात मासेमारीला जात असतात. मे महिन्यात पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत असल्यामुळे मासळीची मागणी वाढते आणि दरही चांगला मिळतो. हर्णे बंदरात ताजी मासळी खरेदीसाठी झुंबड उडते तसेच सुकी मासळीलाही प्रचंड मागणी होती; मात्र यावर्षी पावसामुळे अंतिम टप्प्यातील उत्पन्नाला मच्छीमारांना मुकावे लागले. शेवटच्या टप्प्यात कोळंबी, पापलेट, म्हाकुळ, बिलजा यासारखी मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात मिळत होती; मात्र त्यावर पाणी सोडावे लागले.

वॉटर स्पोटर्सलाही फटका – जलक्रीडा उद्योगातून अनेक कुटुंबे सावरली आहेत. यंदा पावसामुळे १० दिवस अगोदर वॉटरस्पोर्ट्स बंद करावे लागले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे. पुढील चार महिने व्यवसाय बंद राहिल्यामुळे या कालावधीत आम्ही करायचं काय, असा प्रश्न व्यावसायिकांना पडल्याचे दापोलीतील मुरूड वॉटरस्पोर्ट्सच्या सदस्यांनी सांगितले.

मच्छीमारांचे २० कोटींचे नुकसान – मासेमारी व पर्यटन या दोन्ही व्यवसायांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. हर्णे बंदरात दररोज १ कोटींची उलाढाल होते; परंतु २० ते ३१ मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसामुळे ११ कोटींची उलाढाल झालेली नाही. या १० दिवसांमध्ये एका नौकेला सुमारे २ लाखाचे उत्पन्न मिळाले असते, त्यावर पाणी फेरावे लागणार आहे. दाभोळपासून ते केळशीपर्यंत सुमारे १००० नौका असून त्यांचे सुमारे २० कोटींचे नुकसान या पावसाने केले आहे.

मासेमारीवर अवलंबून अन्य उद्योगही संकटात – मासेमारीवर अवलंबून असलेल्या हर्णे बंदरातील बर्फ कंपन्या, फेरीवाले, हार्डवेअर, किराणा अशा अनेक छोट्या उद्योगांवरही होणार आहे. मासेमारी बंदीसाठी अजून काही दिवस शिल्लक असले तरीही मॉन्सून आणि खवळलेला समुद्र पाहता नौका समुद्रात नेणे अशक्य आहे. बहुसंख्य मच्छीमारांनी आंजर्ले खाडीत नौका शाकारण्याची तयारीही केली आहे. त्यामुळे बाजारात माशांचे प्रमाण घटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular