मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटाचे सौंदर्य पावसामुळे खुलले असले तरी येथील धोकादायक वळणावर अपघाताचा धोका कायम आहे. त्यामुळे हे ठिकाण अपघाताच्यादृष्टीने संवेदनशील बनले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणामुळे घाटातील प्रवास सुस्साट झाला असला तरी अवघड वळणावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघात रोखण्यासाठी अवघड वळणावर १३ ठिकाणी टाकण्यात आलेले गतिरोधकही कुचकामीच ठरत आहेत, याशिवाय संरक्षक भिंतीवर केलेला टायर तंत्रज्ञानाचा अवलंबही फोल ठरला आहे. चौपदरीकरणापूर्वी अपघाताच्या मुंबई-गोवा महामार्गावरील दृष्टीने शापितच बनला होता. घाटात प्राणातिक अपघातांसह छोटे-मोठे अपघात घडत होते. सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक ठप्प होऊन प्रवासास विलंब होत होता.
पावसाळ्यात दरडी कोसळून वाहतुकीचा खोळंबा होत होता. खवटीपासून परशुराम घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ झाल्यानंतर ठेकेदार कंपनीने भोस्ते घाटातील चौपदरीकरणालाच सर्वप्रथम प्राधान्य दिले. चौपदरीकरणानंतरही भोस्ते घाटात अपघातांची मालिका आजही कायम आहे. भोस्ते घाटातील अवघड वळणावर सातत्याने घडणारे अपघात रोखण्यासाठी तब्बल १३ ठिकाणी गतिरोधक बसवले; मात्र गतिरोधक बसवूनही अपघात रोखण्यात अपयशच आले आहे याशिवाय सतत घडणाऱ्या अपघातांना लगाम घालण्यासाठी संरक्षक भिंतीवर टायर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची नवी शक्कल लढवण्यात आली; मात्र हा अवलंबही फोल ठरला आहे.