खेड तालुक्यातील लोटे औद्योगीक वसाहतीमध्ये मागील काही महिन्यांच्या अंतराने दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. लोटे एमआयडीसीतील संकल्प या रासायनिक कारखान्याला दुपारी अचानक आग लागली. या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, कारखान्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लोटे आद्योगिक वसाहतीतील संकल्प या कारखान्यात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागली तेव्हा कारखान्यात काही काम करत होते. आग लागल्याचे कळताच सारे कामगार तात्काळ कारखान्याबाहेर पळाले. आगीची खबर अग्निशमन दलाला मिळताच लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशाम दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आजूबाजूचे नागरिक देखील घटनास्थळी धावले. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि नागरिक यांनी शर्तीचे प्रयत्न करून केवळ अर्ध्या तासात भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कारखान्याची मालमत्ता जळून गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी लोटे येथील पोलीस चौकीमध्ये संपर्क साधला असता, या आगीबाबत मात्र पोलिसांना काहीच माहिती नसल्याचे समोर आले. कारखान्याला लागलेली आग अर्ध्या तासानंतर विझली तरी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीमध्ये आगीबाबत काहीच माहिती उपलब्ध पेक्षा कळलेलीच नसावी ही बाबत आश्चर्यकारक आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीत अलीकडे वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत. कधी स्फोट, कधी आग तर कधी वायुगळती यामुळे औद्योगीक वसाहतीत काम करणारे कामगार आणि परिसरात राहणारे नागिरक जीव मुठीत धरून जगत आहेत. मात्र कारखानदार कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी नियमबाह्य काम करत असल्याचा आरोप केला जात आहे.