मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोकण रेल्वेमार्गावरील मडगावपर्यंत धावणाऱ्या एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोकण रेल्वेचे नॉनमॉनन्सूमधील वेळापत्रक लागू झाल्यापासून बिघडले आहे. जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाडीच्या फेऱ्यांसाठी स्वतंत्र रेक नसल्यामुळे १ नोव्हेंबरपासून गाडी तीन ते चार तास किंवा कधी कधी त्याहीपेक्षा जास्त विलंबाने धावत आहे. कोकण रेल्वेमार्गावर पूर्वी सुरू असलेली डबलडेकर एक्स्प्रेस बंद करून त्या ठिकाणी गेल्या वर्षी २२ डब्यांची एलएचबी गाडी सुरू करण्यात आली. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार, ही गाडी आठवड्यातून दोन दिवस तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातील चार दिवस कोकण रेल्वेमार्गावर धावते.
१ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांसाठी बिगर पावसाळी वेळापत्रक सुरू झाले आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात काहीसा बदल झाला आहे. वास्तविक हा बदल दरवर्षीच होत असतो. या वेळी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव धावणारी गाडी आठवड्यातून चार दिवस धावणारी गाडी १२ नोव्हेंबरपासून बिघडलेल्या वेळापत्रकानुसार धावत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतून सुटलेली ही गाडी गोव्यात मडगावला पोहोचल्यानंतर सायंकाळी लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंतच्या प्रवासासाठी निघते.
दोन्ही बाजूच्या प्रवासासाठी एकच रेक असल्यामुळे एका बाजूच्या गाडीला विलंब झाल्यावर तोच रेक वापरून दुसऱ्या बाजूने निघणाऱ्या गाडीला देखील आपसूकच विलंबाचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गाडीचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना फटका सहन करावा लागत आहे.