गेल्या काही वषार्पासून तालुक्याच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवरील भागामध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. रविवारी राजापूर वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची ६१ अंडी आढळून आली. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली किनाऱ्यावरच घरटे तयार करून योग्यपद्धतीने त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे माडबन किनारी १०५ कासवाची अंडी सापडली आहेत. त्यांचे सुद्धा संवर्धन वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांच्या डाटा संकलनाचे काम सुलभ करण्यासाठी मँग्रोव्ह सेलने एम- टर्ट्ल ॲपची निर्मिती केली आहे. हे ॲप चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्रा यांच्या सहकार्याने बनविण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील कासवांच्या ट्रॅक्टरच्या खुणा मोजण्यासाठी अंड्यांचे तापमान, पिल्लांच्या जगण्याची टक्केवारी हे मॅन्युअली करणे खुप कठीण आणि कष्टाचे बनत चालले होते. त्याचा एक समान डेटा नसल्याने समस्या निर्माण होत होत्या. एम टर्टल ॲप अतिरिक्त काम काढून टाकते आणि सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते.
मँग्रोव्ह फाउंडेशन भविष्यात टर्टल ॲप मध्ये अधिक कार्यक्षमता जोडण्याबाबत विचार करत असून, त्याबाबत कार्यवाही सुद्धा सुरु करण्यात आली आहेत. कासवांची घरटे थर्मामीटरने सुसज्ज करण्याचा विचार आहे. तसेच ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांचे तापमान, घरट्याच्या सभोवतालच्या वाळूसह लॉग इन करण्यात येणार आहे. हि सर्व माहिती पिल्लांचे लिंग ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे, अशी माहिती मँग्रोव्ह फाऊंडेशनचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे यांनी सांगितले. त्यामुळे आता कासवांबद्द्लची इत्यंभूत माहिती या मँग्रोव्ह सेलच्या एम- टर्ट्ल ॲपद्वारे मिळू शकणार आहे.