२०२० वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली. या बैठकीमध्ये उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, सांस्कृतिक कार्यसचिव सौरभ विजय आणि सांस्कृतिक कार्य सदस्य सचिव संचालक बिभीषण चवरे तसेच राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे सर्व शासकीय सदस्य तसेच काही संबंधित अशासकीय सदस्य उपस्थित होते. आशाताईंचे या झालेल्या निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील सांगली येथे आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. आतापर्यंत आशा ताईंनी १६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. वडील दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीतकार होते. त्यांच्या वडिलांचं निधन झाले तेव्हा आशा ताई ९ वर्षांच्या होत्या. यानंतर संपूर्ण कुटुंब पुण्याहून कोल्हापुर व त्यानंतर मुंबईत स्थायिक झाले. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून आशा आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सिनेमांमध्ये गाणं गायला सुरुवात केली. हिंदीसह अनेक भाषांमध्ये आशाताई यांनी आजवर हजारो गाणी गायली आहेत. प्रादेशिक भाषांवर असलेलं त्यांचं प्रेम वेळोवेळी गाण्याद्वारे रसिकांपर्यंत पोहोचलेलं आहे. नवोदित तरुण गायकांसाठी काहीतरी करावं म्हणून काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं.
आशा भोसले यांचा जन्म संगीतमय मंगेशकर घराण्यातील असून त्यांना संगीतकार तसेच गायक दीनानाथांचा संगीताचा वारसा आपसूकच लाभलेला आहे. हृदयनाथ मंगेशकर, लता दीदी या मोठ्या भावंडांचे अमूल्य मार्गदर्शन आणि त्यांची वेळोवेळी लाभलेली साथ या सगळ्यांच्या सहाय्याने आशाताईंचा गायनामधील इतिहास घडत गेला. आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटाद्वारे केली. मराठी गाण्यांसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या स्वरांनी आशाताईंनी आपलं वेगळं प्रस्थ निर्माण केलं. त्यांनी सिनेसृष्टीला अनेक सदाबहार गाणी दिली. मराठी तसेच हिंदी गीतांना त्यांच्या आवाजामुळेच एक नवा लय मिळाला. आजही लोकांना त्यांचे गायलेलं ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’ हे गीत खूपच हृदयाजवळचं वाटतं. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यातही आले आहे.
२००० सालामध्ये भारतीय सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ५ मे २००८ रोजी पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात करण्यात आलं होते. फिल्मफेअर पुरस्कार आशा भोसले यांनी सातवेळा आपल्या नावे केला आहे तर त्याचे नामांकनही 18 वेळा त्यांना मिळालेलं. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कारानेही दोन वेळा आशाताईंना त्यांच्या गाण्यासाठी सन्मानित केले गेले आहे. त्यांच्या आवाजामुळेच मराठी तसेच हिंदी गीतांना एक नवी उंची गाठली. त्यांच्या संपूर्ण संगीतमय कारकिर्दीत त्यांनी अनेक सदाबहार गीतं चित्रपटसृष्टी आणि रसिकांना दिली.
भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वात उच्च स्तरीय मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारनेसुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आणि आता मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याकारणाने आशा भोसले यांना संगीत, कला तसेच गायन क्षेत्रातील अनेक महान कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.