28.4 C
Ratnagiri
Friday, October 25, 2024
HomeChiplunकोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

वीज जोडणीचे काम सुरू राहिल्याने वीजपुरवठा चालू बंद होत होता.

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले. दोन्ही तालुक्यांत अनेक गावांत काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत, तर अनेक ठिकाणी तारा तुटून नुकसान झाले. या वादळाने महावितरणचे ५१ लाख १० हजारांचे नुकसान झाले. चिपळूण आणि गुहागरातील ८५ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यातील ८३ हजार ८३७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला असून, वीजजोडणीचे काम अद्यापही सुरूच आहे. १६ मे रोजी चिपळुणात झालेल्या वादळी तडाख्यात महावितरणचे एकूण २४ उच्चदाब वाहिनीचे खांब व ५३ लघुदाब वाहिनीचे खांब तसेच वीजवाहिनीचे ५६ गाळे पडून जमिनदोस्त झाले.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. ज्या ठिकाणी खांब पडले व तारा तुटल्या आहेत, तो भाग बंद करून उर्वरित ठिकांणचा वीजपुरवठा चालू करण्यात आला. महावितरणच्या चिपळूण विभागांतर्गत १३ मे रोजी झालेल्या वादळामुळे चिपळूण व गुहागर तालुक्यात एकूण १० उच्चदाब वाहिनीचे खांब व १४ लघुदाब वाहिनीचे खांब पडून जमिनदोस्त झाले होते. हे पडलेले खांब महावितरणकडून १४ मे रोजी उभे करून सर्व ठिकाणचा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला होता.

वादळामुळे चिपळूण तालुक्यातील खडपोली, कोळकेवाडी, पेढांबे, कादवड, सावर्डे (केदारनाथ कॉलनी), कोकरे परनाकवाडी, दुर्गेवाडी, तिवरे, चिंचघरी, चिवेली, केळने गावठाण, वालोपे, धामनवणे, गणेशवाडी, कळवंडे वरपेवाडी, शिरळ मोहल्ला, मिरजोळी दत्तवाडी आणि जुवड, कापसाळ, मार्कंडी, मिठागरी मोहल्ला व गुहागर तालुक्यातील पालशेत, पाचेरीसडा, पायंडेवाडी, काजुलीं ब्राह्मणवाडी, रानवी या गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी रात्रीही वीज जोडणीचे काम सुरू राहिल्याने वीजपुरवठा चालू बंद होत होता.

RELATED ARTICLES

Most Popular