पोलिसांना आम्ही वेडे वाटलो का? घोड्यावर बसलेल्या साडेसहा फुटावरच्या मावळ्याची तोडफोड एक बेवडा तोडू शकतो का? असा प्रश्न उपस्थित करत हा कट आहे. याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. संघटित व्हा, जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे एक पाऊल मी तुमच्या पुढे असेन, अशी ग्वाही माजी खासदार नीलेश राणे यांनी दिली. टीआरपी येथील हर्षा हॉटेलच्या हॉलमध्ये हिंदू एकता सभेमध्ये ते बोलत होते. मालवण येथील दुर्घटना, रत्नागिरीत झालेली मावळ्यांची तोडफोड आणि ३ महिन्यांपुर्वी घडलेले सर्व प्रकार याविरोधात रत्नागिरीत हिंदू एकता सभेचे आयोजन केले होते. या सभेला प्रमुख वक्ते म्हणून माजी खासदार नीलेश राणे यांना बोलावण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळ माने, संजय जोशी, राजेश सावंत, अनघा जैतपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. नीलेश राणे म्हणाले, मालवण येथील पुतळा पडला, पश्चिमेकडून वारे आले आणि पुतळा देखील पश्चिमेलाच कोसळला, हे मी सांगत नाही हे रिपोर्ट सांगतायत. तीन महिन्यांपूर्वी याच रत्नागिरीत एका वासराचे अवशेष मिळून आले. त्यानंतर अनेकांनी आपली अक्कल लढवली. पोलिसांनी तर कुत्र्याने वासरू मारले, असा जावईशोध लावला परंतु हा एक कट आहे. ज्यावेळी आम्ही रस्त्यावर उतरलो त्यावेळी एका तासात आरोपीला हजर कसे केले.
रत्नागिरीतील मारुती मंदिर येथे एका घोड्यावर एक मावळा बसला आहे. घोड्याची उंची चार ते साडेचार फूट आहे व त्यावर ६ फुटापर्यंत मावळा आहे. ६ फुटावर हा बेवडा गेला कसा? हे प्रकार कोकणात घडू लागले. याची चौकशी करा असे राणे यांनी सांगितले. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. महाजारांनी संघर्ष केला म्हणूनच आज आपली आडनाव शाबूत राहिली आहेत. ही वेळ विचार करण्याची नाही तर संघर्ष करण्याची आहे असेही ते म्हणाले.