रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड स्थानक परिसरात ४ लाखांच्या जुन्या चलनी नोटा जप्त करत एका व्यक्तीवर एलसीबी रत्नागिरी व स्थानिक पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याने एक प्रकारे खळबळ माजली आहे. नोटाबंदी जेंव्हा करण्यात आली तेंव्हा कायदेशीररित्या जुन्या नोटा चलनात आणण्यासाठी प्रतिबंधित करण्यात आल्या असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुना नोटा सापडल्याने या नोटा नेमक्या कोणी आणल्या आणी आता त्या कुठे नेण्यात येत होत्या, याचा कसून पोलीस तपास सुरु करण्यात आला आहे.
मंडणगड पोलीस ठाण्यातून यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता आसिफ मकसुद खान वय ४०, मूळ रा. कुडकी, सध्या रा. वडवली ता. श्रीवर्धन यांच्या चारचाकी टाटा नॅनो गाडीत हजार रुपयांच्या दर्शनी मूल्य असणाऱ्या ३०० नोटा आणि पाचशे रुपयांच्या दर्शनी मूल्य असणाऱ्या १९५ नोटा अशा एकूण ३ लाख ९७ हजार ५०० रुपयांच्या नोटा सापडून आल्या.
बंद झालेल्या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडण्याची ही पहिलीच घटना मंडणगडमध्ये घडली आहे. या नोटा नक्की कुणाच्या आहेत, त्या कोणाकडून आणल्या आहेत, त्या मंडणगडमध्ये कशा आल्या, त्या नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी आणण्यात आल्या आहेत, याबाबत पोलिसांनी आसिफ याला विचारणा केली असता त्याने उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. आणि या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी मंडणगड येथे आणल्याचे त्याने सांगितल्याने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. सेशन ऑफ लायबीलिटीज (आरबीआय) २०१७ कायद्यांतर्गत ३,५,७ प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या नोटा नेमक्या कुठून कोठे जात होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.