रत्नागिरी शहरात एकता मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी सापडलेले मांस गो वर्गीय प्राण्याचे असू शकते, असे अहवाल पशुसंवर्धन विभागाच्या सहायक आयुक्तानी दिल्याची माहिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्या प्रकरणात गोहत्या प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान अपार्टमेंटच्या वॉचमन सह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वॉचमनला अटक करण्यात आली आहे. शहरातील मारुती मंदिर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनच्या खोलीत एका प्राण्याचे तीन ते चार किलो मांस सापडल्याची धक्कादायक घटना मंगळवार ३ जून रोजी रात्री ९ वा. च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अपार्टमेंटचा वॉचमन रणजीत दमाई, त्याची पत्नी आरती रणजीत दमाई (दोन्ही मुळ रा. नेपाळ सध्या रा. यशोधा अपार्टमेंट संसारे गार्डन एकता मार्ग, रत्नागिरी) आणि नासिर मुल्ला (रा.रत्नागिरी) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात रणजीत दमाईला पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवारी संध्याकाळी मारुती मंदिर नजीकच्या एकता मार्ग येथे रस्त्यात उपयुक्त पाळीव पशूचा कापलेला पाय आढळून आल्याने सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. दरम्यान, याची माहिती मिळताच शहर पोलीसही तात्काळ दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका दुचाकीवरून तिघेजण येऊन त्यापैकी एक जण हातात पिशवी घेऊन निघून गेल्याचे दिसून आले. या व्यक्तीचा शोध घेतला असता तो नजीकच्या तेथील अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या खोलीची झडती घेतली असता, त्यांना एका टबमध्ये प्राण्याचा मागच्या बाजुचा पाय आणि अंदाजे तीन ते चार किलो मांस मिळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून मास जप्त केले आणि वॉचमनच्या पत्नीला तात्काळ ताब्यात घेतले. तेव्हा तिने आपल्या पतीने हे मांस नासिर मुल्लाकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. गोरक्षक सुशील कदम यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत वॉचमनच्या घरात सापडलेले मांस तपासणीसाठी खेडशी येथील लॅबला पाठवण्यात आले आहे. दरम्यानं रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की पशुसंवर्धन विभागाच्या सहायक आयुक्तानी दिलेल्या अहवालानुसार सापडलेले म ांस गोवंशीय प्राण्याचे असू शकते. तसे सिद्ध झाल्यास या प्रकरणात गोहत्या प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी आरती रणजीत दमाई, रणजीत दमाई आणि नासिर मुल्ला या तिघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९, ३२५,८ २३८, ३ (५) तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ ए, ५ बी, ५ सी, ९ ए आणि १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.