आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांसह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी (ता. २९) मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या वेळी पक्षातील इच्छुकांपैकी एक उमदेवार निश्चित करायचा, अन्य पक्षातून येण्यास इच्छुक असलेल्याला संधी द्यायची का याबाबत मते जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यासाठी ही बैठक होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या या बैठकीसाठी पाचही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांसह जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक अशा पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघासाठी या बैठकीत दुपारी १.३० ते ३ अशी वेळ देण्यात आली आहे. पितृपक्ष संपल्यानंतर लगेचच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. रत्नागिरीचा उमेदवार कोण असणार याबाबत आतापासून अंदाज लढवले जात आहेत. राजेंद्र महाडीक, उदय बने, बंड्या साळवी, तोडणकर हे चार उमेदवार इच्छुक आहेत. तालुक्यात वेगळेच राजकीय वारे वाहू लागले आहे. भाजपचे नेते माजी आमदार बाळ माने यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
मात्र ठाकरे गटाच्या निरीक्षकांनी याबाबत इच्छुकांशी चर्चा केली आहे. आयत्यावेळी इतर पक्षातील एखादा नेता आला तर त्याला उमेदवारी द्यायची काय, या बाबतचे मत या बैठकीत जाणून घेतले जाणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेनंतर भविष्यातील प्रवेश निश्चित होणार असल्याचे समजते.