तालुक्यातील नाणीज येथून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गावर आजूबाजूच्या गावाच्या सुरक्षिततेसाठी अंडरपास व्हावा आणि मुंबई-गोवा महामार्गावर निवळी बाजारपेठेत होणाऱ्या उड्डाणपूलऐवजी सरळ महामार्ग व्हावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांनी आज रत्नागिरीत आलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांची भेट घेतली. या वेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याच्या आणि आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन नीलेश राणे यांनी दिले. रत्नागिरी तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि मिऱ्या- नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे; मात्र काही ठिकाणी महामार्गाचे काम करताना स्थानिकांना संबंधित विभाग आणि ठेकेदारांनी विश्वासात घेतले नसल्याचे पुढे आले आहे.
याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी दौऱ्यावर आलेले माजी खासदार नीलेश राणे यांची संबंधित ग्रामस्थ, व्यापारी व्यावसायिकांनी भेट घेतली. त्यात नाणीज येथे सातत्याने अपघात होत आहेत. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला गावे आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी येथे महामार्गावर अंडर पास करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या वेळी मिऱ्या-नागपूर महामार्ग विभागाचे उपव्यवस्थापक गोविंदा भैरवा तसेच अधिकारी राकेश सिंग आणि ठेकेदार उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या मागणीचा तातडीने विचार करा यासाठी केंद्र सरकारकडून लागणारी मदत निश्चित करू, असे नीलेश राणे यांनी सांगितले.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला बसस्टॉप देण्याचेही अधिकाऱ्यांनी मान्य केले. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी बाजारपेठेत होणाऱ्या उड्डाणपुलाऐवजी सरळ महामार्ग व्हावा, अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांनी नीलेश राणे यांच्याकडे केली. निवळी येथे व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी महामार्ग अधिकारी राजेंद्र कुलकर्णी, तसेच व्यापारीसंघाचे अध्यक्ष संतोष पाध्ये आणि अन्य व्यापारी उपस्थित होते. या संदर्भात निवळी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. १३० हून अधिक व्यापारी आणि व्यावसायिक उपस्थित होते. या वेळी भाजपा ओबीसी सेलचे भाई जठार, अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय निवळकर, नित्यानंद दळवी, अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.