बुद्ध विहाराचे ५० वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण करू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे. या बौद्धविहारामधून देशभर शांतीचा संदेश जावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी आज मंत्री बनू शकलो. पण, या कामाबाबत काहींना पोटशूळ उठला आणि चुकीचे संदेश सोशल मीडियावर फिरवल्या. अशा पोटशुळांना तुम्हीच औषध द्या. या कामात आडकाठी आणणाऱ्यांचे पुढे काय करायचे हे तुम्ही ठरावा, असे चिमटे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले. राज्य उत्पादश शुल्क विभागाच्या नूतन इमारतीचे आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामागे असणाऱ्या थिबा राजाकालीन बुद्धविहार विकसित करण्याच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले, गेल्या पन्नास वर्षांपासून या बुद्ध विहारासाठी जागा द्यावी म्हणून समाजाचे प्रयत्न सुरू होते. आपणही गेली १० वर्ष सातत्याने येथील प्रमुख व्यक्तींबरोबर जाऊन मंत्रालयात बैठका घेत होतो; परंतु हा प्रश्न नुकताच दोन महिन्यांपूर्वी मार्गी लागला. त्यानंतर जिल्हा नियोजनमधून यासाठी सव्वासात कोटीहून अधिकचा निधी आपण दिला. हा बुद्धविहार वर्षभराच्या आत पूर्ण करून तुमच्या स्वाधीन केला जाईल. पावसापासून तुमचे संरक्षण व्हावे, म्हणून मी एसटी पाठवल्या. पण, तुम्हाला सुरक्षित आणल्यामुळे देखील काही लोकांना पोटदुखी झाली आहे.
यावेळी थिबाकालीन बुद्ध विहार विकास समिती ट्रस्टचे पदाधिकारी प्रकाश पवार, एम. बी. कांबळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अधीक्षक अभियंता मिलींद कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विजय चिंचाळकर, रत्नागिरीच्या अधीक्षक किर्ती शेडगे, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, आदी उपस्थित होते.
विरोधकांचा अपप्रचार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. आरक्षण दिले, हेच आरक्षण रद्द करणार म्हणून राहुल गांधी परदेशात जाऊन सांगत आहेत; परंतु त्यांच्यावर कोणी काही बोलायला तयार नाही, याची मला खंत वाटते. लोकसभा निवडणुकीत हेच लोक आम्ही संविधान बदलणार असल्याची अफवा उठवत होते. तेच आज आरक्षण रद्द करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे सत्तेसाठी राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीबरोबर रहायचे की सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणाऱ्या महायुतीबरोबर रहायचे ते तुम्हीच ठरवा, असे उदय सामंत म्हणाले.