24.4 C
Ratnagiri
Sunday, August 17, 2025

पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर – पालकमंत्री डॉ. सामंत

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य...

रत्नागिरीतील एका बँकेत? नोटीस येताच खळबळ

रत्नागिरी जिल्ह्यातील एका बड्या बँकेच्या ९३ कर्जदार...

चिपळुणातील वृध्द महिलेची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीसाला अटक

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेकडील ४...
HomeMaharashtraमोदींचे दिवाळी गिफ्ट! मध्यमवर्गीयांना मिळणार मोठा दिलासा

मोदींचे दिवाळी गिफ्ट! मध्यमवर्गीयांना मिळणार मोठा दिलासा

जीवनावश्यक वस्तूंचा समावेश ५ टक्के कराच्या यादीत करण्यात येईल.

सणासुदीचे दिवस सुरू झाले असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला जीएसटीच्या माध्यमातून दिवाळीत मोठे गिफ्ट दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. जीएसटीचा १२ टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे रद्द करून त्यातील अनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश ५ टक्के कराच्या यादीत करण्यात येईल. यामुळे महागाईने पोळलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जीएसटी कपातीमुळे लोणी, तूप, प्रक्रिया केलेले अन्न, बदाम, मोबाईल, फळांचा रस, भाज्या, फळे, काजू किंवा वनस्पतींच्या इतर भागांपासून बनवलेले पदार्थ ज्यात लोणचे, मुरांबा, चटणी, जाम, जेली, पॅक केलेले नारळ पाणी, छत्री यांच्यासह १००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कपडे, १००० रुपयांपर्यंतचे शूज, टूथपेस्ट आदी अनेक वस्तूंच्या किंमती कमी होऊ शकतात. मध्यमवर्गीय समाजाला हा एक मोठा दिलासा असेल.

मोदी नेमके काय म्हणाले? – स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना १४० कोटी जनतेला दिवाळीपूर्वी एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आगामी काळात जीएसटीमध्ये मोठा बदल करण्याचे घोषित केले आहे. आम्ही सलग ८ वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी काम करत आहोत. आता आम्ही पुढच्या पिढीच्या जीएसटीवर काम करत आहोत. या दिवाळीत आपण खरेदी करत असलेल्या आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू स्वस्त होतील. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

स्वस्ताईचा जमाना – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीत गिफ्ट देण्याची घोषणा करताच मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलची बैठक सप्टेंबर महिन्यात होणार आहे. यावेळी सर्वसाधारण सभा होणार नाही, तर मोदींच्या या घोषणेच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेवर या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

स्लॅबमध्ये बदल – जीएसटी अंतर्गत सध्या ५, १२, १८, २८ टक्के असे स्लॅब आहेत. या विद्यमान स्लॅबमध्ये बदल प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून दोन दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. अर्थ मंत्रालयाने सांगितले की त्यांनी दोन स्लॅब जीएसटी संरचना मानक आणि गुणवत्ता – प्रस्तावित केली आहे. निवडक वस्तूंवर विशेष दर देखील प्रस्तावित करण्यात आले. या रिफॉर्म्समध्ये वर्गीकरणाशी संबंधित विवाद कमी करणे, विशिष्ट क्षेत्रांमध्ये उलटे शुल्क संरचना दुरुस्त करणे, अधिक दर स्थिरता सुनिश्चित करणे आणि व्यवसाय सुलभता वाढवणे यांचा समावेश असेल. तसेच यामुळे प्रमुख आर्थिक क्षेत्रे मजबूत होतील, आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल आणि क्षेत्रीय विस्तार सक्षम होईल.

१२ टक्क्यांचा स्लॅब रद्द होणार? – सध्याच्या जीएसटी प्रणालीमध्ये प्रामुख्याने ०%, ५%, १२%, १८% आणि २८% असे ५ टॅक्स स्लॅब आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार १२% चा स्लॅब पूर्णपणे रद्द करण्याचा विचार करत आहे आणि असं झाल्यास १२% स्लॅब अंतर्गत येत येणारी बहुतेक उत्पादने ५% स्लॅबमध्ये जोडली जाऊ शकतात. मोदींनी आज आपल्या भाषणात जीएसटी कपातीचे स्पष्ट संकेत देताना स्वस्ताईचे आश्वासन दिले आहे.

सर्वसामान्यांना दिलासा – हा स्लॅब रद्द झाल्यास १२% च्या स्लॅबमध्ये असलेल्या अनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश पहिल्या ५ टक्क्याच्या स्लॅबमध्ये होऊ शकतो. सध्या १२% स्लॅबमध्येप्रक्रिया केलेले अन्न (लोणी, तूप, सॉस), मोबाईल फोन (काही प्रकरणांमध्ये), छत्री, शिवणकामाच्या मशीन आणि अनेक दैनंदिन वस्तूंचा समावेश आहे. अशा स्थितीत वरील उत्पादने ५% च्या स्लॅबमध्ये आली तर त्यांच्या किमती थेट कमी होतील. सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा असेल. करोनानंतर सर्वांना आरोग्य आणि जीवन विम्याचे महत्त्व समजले आहे, पण सध्या विम्यावर १८% जीएसटी अनेकांना अडचणीत आणतो. अशा स्थितीत, यावर जीएसटी परिषद मोठी सवलत देण्याचा विचार करू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी एकतर लक्षणीयरीत्या कमी किंवा शून्यही केला जाऊ शकतो, ज्यामुळे विमा पॉलिसीचा प्रीमियम थेट लक्षणीयरीत्या कमी होईल, असा अंदाज आहे.

सणासुदीच्या दिवसात स्वस्ताई – त्याचवेळी, सरकार सर्वसामान्यांना रोजच्या महागाईपासून दिलासा देऊ शकते. परिषदेच्या बैठकीत दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचारही केला जाऊ शकतो पण, कोणकोणत्या वस्तूंवर जीएसटी दर कमी होईल यावर स्पष्टता नाही. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल. पंतप्रधानांनी अनेक वस्तू स्वस्त होतील, अशी घोषणा केल्याने दरकपात होणार असल्याचे स्पष्टपणे संकेत मिळत आहेत. महागाईने पोळलेल्या मध्यमवर्गीयांसाठी मोदींनी दिलेला हा मोठा दिलासा असल्याचे मानले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular