राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून येत्या शुक्रवारी २५ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज वाजत, गाजत सादर करणार आहेत. ना. उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून २००४ च्या निवडणुकीपासून सलग ४ वेळा विजयी झाले आहेत. विजयाचा चौकार ठोकल्यानंतर आता विजयाचे पंचक पूर्ण करण्यासाठी ते मैदानात महायुतीचे उम`दवार म्हणून उतरणार आहेत.
२००४ च्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पुढील सर्व निवडणुकांमध्ये वाढत्या मताधिक्क्याने निवडून आले. २०२४ च्या या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप – राष्ट्रवादी (अजित पवार गट), आरपीआय (आठवले गट) अशा महायुतीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरणार आहेत. आपल्या विजयाचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. २५ ऑक्टोबरला सकाळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची स्वयंवर मंगल कार्यालयात बैठक होईल. त्यानंतर सर्व कार्यकर्ते आणि नेते हॉटेल विवेकच्या मराठा मैदानावर एकत्र येतील आणि तेथून मिरवणूकीला सुरुवात होईल.
यावेळी महायुतीचे राज्यस्तरीय नेते उपस्थित असतील. रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत ना. सामंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी वाजत, गाजत यावे असे आवाहन महायुतीच्यावतीने करण्यात आले आहे.