तालुक्यातील एका गावात काही दिवसांपूर्वी घरात एकट्या असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने तोंड दाबून, तसेच दोन्ही हात पकडून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. याबाबत बाहेर वाच्यता केलीस, तर तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी पीडितेला दिल्याने ती घाबरली होती. त्यामुळे काही दिवसानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. दरम्यान, त्या नराधमाच्या संगमेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. योगेश यशवंत पवार (वय २८) असे त्या नराधमाचे नाव आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एका गावातील योगेश यशवंत पवार (वय २८) याने अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरात गेला. पीडिता पाणी आणण्यास घरात जाताच तरुणाने दरवाजा बंद केला. त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी भयभीत झाली.
ती ओरडा करण्यापूर्वी तिचे तोंड दाबून व दोन्ही हात पकडून ओरडलीस तर तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी देत अत्याचार केले. त्यामुळे पीडित मुलीने घडलेल्या घटनेची वाच्यता काही दिवस कोठेच केली नाही. काही दिवसांनी त्या नराधमाच्या पत्नीला तिच्या पतीने केलेला प्रकार सांगितला. मात्र पत्नीने थेट पीडित मुलगी आणि तिच्या आईवर शिव्यांचा वर्षाव सुरू केला. एवढ्यावरच न थांबता तिने पीडित मुलगी आणि तिच्या आईला मारहाणही केली. अखेर त्या पीडित मुलीने संगमेश्वर पोलिस ठाणे गाठत घडल्या प्रकारची तक्रार २१ मे रोजी दिली. संगमेश्वर पोलिसांनी तक्रार दाखल करून गुन्हा नोंद करून संशयिताला अटक केली असून तपास पोलिस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे करत आहेत.