रत्नागिरी विमानतळ जागेसाठी सुरु असलेली खटपट पाहता, अद्यापही ज्या जमीन मालकांच्या जागा त्यामध्ये गेल्या आहेत. शासनाकडून अद्याप देखील त्यांना मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे जमीन मालकांमध्ये नाराजगी पसरली आहे. विमानतळासाठी अजून जागा लागणार असून, आता मात्र जमीन मालक आपल्या जागा देण्यास विरोध करत आहेत.
या प्रकल्पासाठी ज्यांची जमीन लागणार आहे त्यांच्याशी चर्चा यशस्वी झाली असल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधितांशी त्यांनी या बैठकीत चर्चा केली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रत्नागिरीत मिरजोळे येथे प्रस्तावित विमानतळासाठीच्या भूसंपादनासंबंधित दर निश्चित करण्यात आले आहेत. शासनाने यासाठी ७१ कोटी रुपये दिले आहेत. संदर्भातील जमीनधारकांचे सर्व गैरसमज दूर झाले असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल’, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे दिली आहे. रत्नागिरी येथे विमानतळासाठी असलेल्या समस्या लवकरच दूर होतील. त्यामुळे विमानतळ सुरू होण्यासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत.
कोस्ट गार्डसाठी या विमानतळाचा वापर केला जातो. आता विस्तारित स्वरूपात हा भाग विमानतळासाठी वापरला जाणार आहे. या ठिकाणी भूसंपादनासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ७१ कोटी रुपये, तर विमानतळाच्या इमारतीसाठी ३१ कोटी रुपये असा निधी उपलब्ध करुन दिला आहे. लवकरच विमानतळ उभारणीच्या कामाला गती येईल असे मंत्री सामंत या वेळी म्हणाले. या बैठकीला कोस्ट गार्ड तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.