मिऱ्या येथे लॉजिस्टीक पार्क व्हावा, अशी उद्योग विभागाची भूमिका होती. मात्र मिऱ्या आणि जाकिमिऱ्या या दोन ग्रामपंचायतींनी त्याला विरोध केला. स्थानिकांचा विरोध असेल तर किंवा तिथे गैरसमज निर्माण होत असेल तर तो दूर करण्यासाठी मी स्वतः मिऱ्यावासीयांना भेटणार आहे. जनतेत कसं जायचंय, त्यांचे कसं ऐकून घ्यायचं हे मला चांगलं माहिती आहे. मिऱ्यावासीयांना जे अपेक्षित आहे, ते उद्योग विभाग करेल, त्यासाठी मला आणखी कोणत्याही पुढाऱ्याची गरज नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी मिऱ्या येथील एमआयडीसी प्रकल्पाविषयी ते म्हणाले, “मिऱ्या येथील एमआयडीसीसंदर्भात मिऱ्यावासीयांशी चर्चा करणार आहे. मात्र, कोणाच्याही विरोधात जाऊन, कोणीतरी राजकारण करतेय म्हणून आकस ठेवून कोणतीही गोष्ट करायची नाही. या प्रकल्पाचं नाहक राजकीय भांडवल केलं जात आहे. मिऱ्या येथे लॉजिस्टिक पार्कमुळे पर्यटनावर आधारित व्यवसाय येतील. त्यामधून फार मोठी आर्थिक उलाढाल आणि स्थानिकांना रोजगारही मिळू शकतो.”तालुक्यातील वाटद पंचक्रोशीत दहा हजार कोटींचा प्रदूषण विरहीत संरक्षण क्षेत्रातील चांगला प्रकल्प उभारण्यासंदर्भात निर्णय होईल, असे सांगून ते प्रकल्पाविषयी म्हणाले, “वाटद ग्रामस्थांना कोणी भडकवण्याचा
प्रयत्न करीत असेल तर ग्रामस्थांशी चर्चा करू.
तिथे प्रदूषण विरहित डिफेन्सवर आधारित प्रकल्प येणार आहे. दहा हजार कोटींच्या या प्रकल्पात स्थानिक तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाबाबत कोणी विरोधकांनी वावड्या उठवण्याचा प्रयत्न करू नये. रत्नागिरीत डिफेन्स क्लस्टर उभारण्याचा प्रयत्न आहे. तिथे दहा हजार कोटींचा प्रकल्प उभारला जाणार असून त्यामधून मोठा रोजगार मिळू शकतो. याविषयी येत्या चार दिवसांत निर्णय होईल.”