राजापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील इतिहासकालीन दोन तोफांपैकी एक तोफ गायब आहे. त्या त्तोफेचा प्रशासनाकडून शोध घेतला जावा, अशी मागणी शिवप्रेमींकडून केली आहे. सध्या सुरू असलेल्या माहोलामध्ये सात ते आठ वर्षांपूर्वी गायब झालेल्या तोफांच्या विषयाला चांगलीच बत्ती मिळाली आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या राजापूरला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. राजापूर शहरामध्ये असलेले प्रसिद्ध बंदर ब्रिटिशांच्या येथील वास्तव्याच्या काळामध्ये प्रसिद्ध निर्यात केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. या बंदरातून त्या काळामध्ये जगभरात व्यापारउदीम चालत असे. राज्याचा विस्तार वाढवणे आणि येथील व्यापारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने त्या काळात ब्रिटिशांनी या ठिकाणी वखारही बांधली होती; मात्र, ब्रिटिशांना शह देणे, त्यांच्यावर वचक ठेवण्याच्या उद्देशाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्रिटिशांची ही वखार लुटल्याची इतिहासामध्ये नोंद आहे.
त्या काळातील दोन तोफा येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात होत्या. १९७९ च्या दरम्यान पूर्वीच्या तहसील कचेरीचे सध्याच्या जागी स्थलांतर झाले. त्याचवेळी वखारीमध्ये असलेल्या इतिहासकालीन तोफांचे जतन व्हावे, याकरिता या तोफा नव्या तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन बाजूला ठेवण्यात आल्या होत्या; मात्र, त्या दोनपैकी एक तोफ जागेवर नाही. जवाहर चौक येथील शिवस्मारकाच्या उभारणीच्यावेळी कार्यालयाच्या तहसीलदार प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या तोफांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर सतत शिवप्रेमींकडून तोफांचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे.