अख्खा कोकण अदानीच्या घशात घालण्याचा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना भ्रष्टाचार करणाऱ्यांना जागा दाखवून द्यायची आहे. महाराष्ट्रात बदल घडवायचा आहे. त्यासाठी येत्या २० तारखेला आपण जागृतपणे मतदान करा आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत मतदारांना केले. महाविकास आघाडीचे दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा गुरुवारी दापोलीत झाली. यावेळी आदित्य ठाकरेंनी महायुतीवर जोरदार टीका केली.’
पुन्हा सरकार येणार – यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, काही स्वार्थी लोकांनी उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. परंतू आपणा सर्वांच्या आशिर्वादाने २३ नोव्हेंबरला राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे असा विश्वास संपुर्ण राज्यात मिळत असलेला प्रतिसाद पाहून मला वाटतो. साऱ्या महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. हिंदूत्वाच्या मुद्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी सांगितले की, आपले हिंदूत्व स्पष्ट आहे. आपल्या हिंदूत्वात हृदयात राम आहे आणि हाताला काम आहे. विरोधकांचे हिंदूत्व इतरांची घरे जाळणारे आहे. आपले हिंदूत्व घरातील चुल पेटवणारे आहे. महाराष्ट्रातील उद्योगधदे गुजरातला नेणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. आपले सरकार असताना मॅगनेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून साडे सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. येथील उद्योगपतींना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी पाठबळ दिले असे त्यांनी सांगितले.
गुजरातला पळवले – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्य स्थिरता असते असे येथील उद्योगपतींचे मत आहे. यामुळे उद्योगपतींना देखील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे हवे आहेत. उद्धव ठाकरे हे स्वतःचा विचार न करता प्रथम राज्याचा विचार करतात. सध्या राज्यात रोजगार ‘निर्मिती बंद झालेली आहे. आहेत ते उद्योग व रोजगार गुजरातला पळवले जात आहेत. येथील तरुणांना काम हवे असते. आपले सरकार सत्तेवर आल्यावर येथील तरुणांना ४ हजार रुपये रोजगार भत्ता, मुलांना मुलींप्रमाणे मोफत शिक्षण, लाडक्या बहिणींना दरमहा ३ हजार रुपये व ६ सिलेंडर मोफत, एसटीचा मोफत प्रवास, तसेच सर्वांकरिता २५ लाखाचा कॅशलेस आरोग्यवीमा आपण देत आहोत. ५ लाख रुपयांपर्यंत ट्रीटमेंट देखील मोफत देणार आहोत अशी घोषणा त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांकरिता ३ लाखापर्यंत कर्जमक्ती, जातनिहाय जनगणना करणार असल्याचे सांगून आरक्षण मर्यादा वाढवणार असल्याचे आश्वासन देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी मतदारांना दिले.
घटनाबाह्य सरकार – तसेच शिंदे सरकारने समाजात जातीय तेढ निर्माण केली. शिंदे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. शिंदे सरकारच्या काळात भ्रष्टाचार टिपेला पोचलेला आहे. मालवण येथील शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचाराम ळे कोसळला. घटनाबाह्य सरकार बसवून संविधानाचा अवमान करण्यात आलेला आहे असा घणाघात देखील त्यांनी यावेळी बोलताना केला. तसेच आपण येथे बदला घेण्यासाठी नाही तर बदलाव करण्यासाठी आलेलो आहोत असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.
तुम्हाला काय मिळाले? – यावेळी त्यांनी भाजप व संघ कार्यकर्त्यांना दोन वर्षात तुम्हाला काय मिळाले असा प्रश्न विचारला. सध्या मंत्रिमंडळात असलेले १० मंत्री हे शिवसेनेतून फुटून आलेले आहेत. ९ मंत्री राष्ट्रवादीतून फुटून आलेले आहेत. भाजपच्या असणाऱ्या १० मंत्र्यांपैकी केवळ ६ मंत्री हे मूळ भाजपचे आहेत. ४ जंण बाहेरून आलेले आहेत. ज्यांच्या विरोधात भाजप व संघाचे कार्यकर्ते कायमचे लढले, केसेस अंगावर घेतल्या, तुरुंगात गेले त्यांच्याच पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवारांना पालकमंत्री म्हणून बसवण्यात आले. दोन वर्षांमध्ये महामंडळे, मंदिरांचे न्यास यावर फ टीरगटाचे प्राबल्य आहे. यामुळे या दोन अडीच वर्षात भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांना नेमके काय मिळाले असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज्य वाचविण्याची लढाई – ही आपली लढाई आमदार होण्यासाठी नाही तर राज्य वाचवण्यासाठी आहे. योगी आदित्यनाथ व अमित शहा हे बाहेरून येऊन गुजरात व यूपीचे मॉडेल दाखवतात. मात्र कोविडच्या काळात गंगेमध्ये वाहिली तशी महाराष्ट्रात प्रेते वाहीली नाहीत व गुजरातमध्ये ज्याप्रमाणे ऑक्सिजनला रांगा लावाव्या लागल्या तशा म हाराष्ट्रात लावाव्या लागल्या नाहीत असेही त्यांनी ठणकाहून सांगितले. प्रगतीशिल महाराष्ट्र घडवण्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला संजय कदम यांच्या मशाल निशाणी समोरील बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.