नववर्षाच्या आगमनास काही दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे तितक्याच जल्लोषात स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले असताना पोलिसांनी कंबर कसली आहे. सध्या पोलिसांकडून हॉटेल, लॉज, कॉटेजचालक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अंमली पदार्थांची विक्री होत असल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. रत्नागिरी पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात असलेली सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. नाताळ आणि त्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी येथील हॉटेल, लॉज, कॉटेजेस यांची शंभर टक्के बुकिंग १५ दिवसांपूर्वीच झाली आहे.
राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची ओळख पटल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशा सूचना देण्यात येत आहेत. यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला आधारकार्ड, ड्रायव्हिंग परवाना, वाहनांची कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर तपासणी नाके तयार करण्यात येणार असल्याची माहिती खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी दिली. थर्टीफर्स्टनिमित्त पर्यटक, व्यावसायिक जय्यत तयारी करत असताना ड्रम्स तस्करही आपले जाळे विस्तारित आहेत. पूर्वी मर्यादित असलेला अंमली पदार्थाचा व्यापार आता ग्रामीण भागात पसरत आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आदी ठिकाणी पोलिसांनी यापूर्वी कारवाया केल्या आहेत.