शिवसेना ठाकरे गटाचे नेते व गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव हे संगमेश्वर तालुक्यात वारंवार दौरे करत असून त्यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाल्याची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. या पार्श्वभूमिवर त्यांनी बुधवारी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रविंद्र माने यांची भेट घेतल्याने या चर्चेला अधिकच बळ मिळाले आहे. संगमेश्वर तालुक्याच्या राजकारणावर माने-बनेंचे म्हणजेच माजी राज्यमंत्री रविंद्र माने व माजी आमदार सुभाष बने यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या दोघांची आमदार भास्करशेठ जाधव हे भेट घेतील असा अंदाज होता तो खरा ठरला.
बुधवारी आ. जाधव यांनी माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांची त्यांच्या पाटगाव येथील रविराज या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जाते. तर माजी आमदार सुभाष बने यांचीही ते लवकरच भेट घेणार आहेत, असे कळते. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्करशेठ जाधव हे गुहागरचे आमदार आहेत. मात्र त्यांचे संगमेश्वर तालुक्यात सध्या दौरे वाढल्याने ते अगामी विधानसभेची निवडणूक चिपळूण- संगमेश्वरमधून लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे गेले अनेक दिवस बोलले जाते. त्यामुळेच त्यांच्या तालुक्यात गाटीभेटी वाढल्या आहेत, असे बोलले जात आहे.
देवरूखमधील छत्रपती शिवाजी चौक येथील ठाकरे गटाच्या दहिहंडीला त्यांनी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर गणेशोत्सवात त्यांनी तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत गणरायांचे दर्शन घेतले होते. आता पुन्हा त्यांच्या तालुक्यात गाठीभेटी वाढल्याने त्याचा संदर्भ त्यांची चिपळूण-संगमेश्वर विधानसभेच्या उमेदवारीशी जोडला जात असून तशी चर्चा सुरु झाली आहे. बुधवारी त्यांनी माजी राज्यमंत्री रविंद्रजी माने यांची भेटघेत त्यांचे आशिर्वाद घेतले. तसेच त्यांच्याशी सविस्तर चर्चाही केली. यावेळी त्यांच्यासमवेत ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, संतोष लाड, मुन्ना थरवळ, विश्वास फडके, बाबा दामुष्टे, साडवलीचे सरपंच राजेश जाधव, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष बाबा साळवी, शेखर खामकर आदी उपस्थित होते.