शिंदे गटाचे ४० आमदार आणि मंत्री गुवाहटीला कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेले असताना, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली होती. भारतातील बारा शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनाला आम्ही आलोय. त्या देवीचा नवस फेडायला दर्शन घ्यायला आम्ही आलोय. मात्र त्या देवीची कोणी विरोधक जर का मस्करी उडवणार असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा शिंदे गटाचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी दिला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी तो अनुभव घेतलाय. आमची श्रद्धा आहे. आम्ही श्री कामाख्य देवीचे दर्शन घ्यायला आलो आहोत. यामुळे विरोधकांनी देवीची मस्करी उडवणे योग्य नाही, असे मत आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कालावधीत हा प्रश्न का हाताळला नाही? असा सवाल शिंदे गटातील दापोली-खेडचे आमदार योगेश कदम यांनी केला आहे. तसेच शिवसेनेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर बेळगाव लढ्यात गुन्हा दाखल झालेला असताना त्यांना पक्षातून बाजूला करण्याचे षडयंत्र केले गेले. त्यावेळी तुमची भूमिका नेमकी काय होती? असा सवालही रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी उपस्थित केला.
देवीला रेड्याच्या बळीवरून विरोधक बोलतायत. पण त्यांच्या मतदारसंघातही या प्रथा आहेत, त्याबद्दल त्यांनी आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही आमदार योगेश कदम यांनी यावेळी दिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांजवळ कोणताही संवाद साधला नाही. आणि आता ते संवाद मेळावे घेत फिरत आहेत. हे तुम्ही अडीच वर्षे पूर्वीच केले असते तर बरे झाले असते, असेही ते म्हणाले.