रत्नागिरीहून रोज चिपळूण दापोली बाजूला दररोज प्रवास करणारे अनेक जण आहेत. ट्रेन आणि एसटी बसचा प्रवासाच्या माध्यमातून हि वाहतूक केली जाते. त्यामुळे ऑफिस सुटल्यावर वेळेत घरी पोहोचण्यासाठी अनेकांची लगबग होत असते. दापोलीहून सायंकाळी ५.३० वाजता सुटणाऱ्या रत्नागिरी एसटी बसची वेळ बदलून ती ६ वाजता सोडावी. सदरची बस दापोलीतून येताना चिपळूण रेल्वेस्थानक मार्गे आणण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
मुंबईहून दक्षिणकडे जाणाऱ्या बहुतांशी गाड्या चिपळूण रेल्वे स्थानकात थांबतात. सायंकाळी ४.४५ वाजता पनवेलहून सुटणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस सायंकाळी ७.४५ वाजता चिपळूणला पोहोचते. मुंबईतील दिवसभराची कामे आटोपून अनेक प्रवासी मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून चिपळूण – रत्नागिरीपर्यंतचा प्रवास करतात. सावर्डे, आरवली, देवरूख, संगमेश्वर, बावनदी परिसरातील प्रवाशांचा त्यात समावेश असतो. मत्स्यगंधा एक्सप्रेसने चिपळूण रेल्वे स्टेशनवर उठल्यानंतर प्रवाशांना खाजगी वाहनाने जावे लागते.
दापोली- रत्नागिरी एसटी बस रेल्वेस्थानका मार्गे केल्यास वाटेतील असंख्य प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात देखील यामुळे भर पडणार आहे. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून रत्नागिरी विभाग नियंत्रक कार्यालय, दापोली आगाराने याबाबतचा विचार करावा असे सांगण्यात येत आहे. सदर मागणीचे निवेदन प्रवाशांमार्फत दापोली एसटी आगारासह रत्नागिरी विभाग नियंत्रक कार्यालयाला देण्यात आले आहे.
खाजगी वाहनाने प्रवास करणे अधिक खर्चिक आहे. याच दरम्यान चिपळूणला येणारी दापोली – रत्नागिरी एसटी बस पकडण्यासाठी प्रवाशांना अथक प्रयत्न करावे लागतात. हातातील सामान घेऊन प्रवाशांना कधीकधी धावत जावे लागते. काही सेकंदाचा उशीर झाल्यास सदरची गाडी रत्नागिरीकडे वेळेवर रवाना होत असल्याने, मग पुढील गाडीसाठी बराच वेळ ताटकळत राहावे लागते.