विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ पासून सुरू होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागा वाटप किंवा उमेदवार जाहीर झालेले नसले तरीही उमेदवारी मिळणार हे निश्चित असलेल्यांनी अर्ज भरण्याचा मुहूर्त काढण्यास सुरूवात केली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस निवडल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे ३३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इच्छुकांनी प्रचार यंत्रणा तळागाळात पोचविण्यास सुरुवात केली आहे. तसेच अर्ज भरण्याचा मुहुर्त काढला आहे.
रत्नागिरी विधानसभेचे आमदार तथा पालकमंत्री उदय सामंत हे २२ ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्याला सामंत यांच्या निकटवर्तीयांकडून दुजोरी मिळाला आहे. राजापूर-लांजामधून शिंदे शिवसेनेतर्फे किरण सामंत आणि गुहागरमधून ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव २४ रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे. चिपळूण-संगमेश्वरमधील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार शेखर निकम यांनी २८ रोजीचा मुहुर्त काढला आहे. मोठ्या शक्ती प्रदर्शनात अर्ज दाखल होणार असल्यामुळे प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.