राज्यातील खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२० या मुदतीत शासकीय निधीमधून त्यांच्या वाहनाला ५ लाख १५ हजार ४७९ रुपये ९१ पैसे वापरून इंधन पुरवठा करत शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात या कथित प्रकरणी ३० जुलै रोजी सांयकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या ५ लाख १५ हजार ४७९ रुपये ९१ पैसे एवढ्या रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
यापूर्वीच तत्कालीन नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी वैभव खेडेकर यांच्यावर असलेल्या आरोपांवरून त्यांना अपात्र ठरवले होते. याप्रकरणी अद्याप वैभव खेडेकर यांना ताब्यात घेण्यात आले नसून अधिक तपास खेड पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सोनाली झेंडे करीत आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४०९ व ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
खेड पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात ३० जुलै २०२२ रोजी तक्रार दिली आहे. खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेड पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक व गटनेते प्रज्योत तोडकरी यांच्यासह सेनेच्या दहा नगरसेवकांनी केलेला. याप्रकरणी मुद्देसुद आणि लेखी स्वरुपात त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे खेडेकर यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी चौकशी करून खेडेकर यांना इंधन वापरासाठी पालिकेतून केलेल्या खर्चात अनियमितता केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी नगरविकास विभागाचे अव्वर सचिव यांच्याकडे अहवाल दिला. त्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभव खेडेकर यांच्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश ७ एप्रिल २०२२ रोजी दिले होते.