तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक कारखान्यातून पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन परिसरातील एका ओढयात रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. या कंपनीबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवले गेले असून जर या कंपनीवर कायदेशीर कारवाई झाली नाही व या कंपनी व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य चिटणीस संजय आखाडे यांनी दिला आहे. खेडमधील लोटे एमआयडीसीमधील एका रासायनिक कारखान्यातून पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन एमआयडीसी परिसरातील एका ओढ्यात रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे लोटे परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अॅलर्ट आहे. खेड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेऊन लोटे एमआयडीसीमधील एका रासायनिक कंपनीने हा घातक प्रकार केला असल्याचे उघड झाले असून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत, ज्या लोटे परिसरात नैसर्गिक नाल्यात केमिकलचे रासायनिक सांडपाणी सोडले आहे. तो नाला लोटे परिसरातील सोनपात्रा नदीला मिळतो, याच परिसरात अनेक गावांच्या नळपाणी योजना देखील आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी देखील दूषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.