लोटे एमआयडीसीमध्ये घडत असलेल्या आगीच्या घटना आणि कारखान्यांमधील स्फोट थांबवण्यासाठी औद्योगिक सुरक्षा विभागामार्फत सर्वच कारखान्यांमध्ये मॉकड्रिल घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ४० कारखान्यांमध्ये मॉकड्रिल घेतली आहेत, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाचे निरीक्षक प्रदीप भिलताडे यांनी ‘सकाळ’ला दिली. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या आगीच्या घटना आणि कारखान्यांमधील स्फोटवर प्रकाश टाकला होता. लोटे एमआयडीसीतील औद्योगिक सुरक्षेबाबत औद्योगिक सुरक्षा विभागाचे निरीक्षक भिंताडे म्हणाले, लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत ८० कारखाने रासायनिक आहेत. त्या सर्वच कारखान्यांच्या औद्योगिक सुरक्षेबाबत आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. कारखान्यातील कामगारांना आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी करणे आणि त्यांना आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे हे शिकवणे गरजेचे असते.
हे काम आम्ही सुरू केलेले आहे. प्रत्येक कारखान्याच्या व्यवस्थापनाशी बोलून त्यांची वेळ ठरवली जाते. त्यानंतर ठरलेल्या वेळेत आम्ही कामगारांना आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण देतो. लोटे एमआयडीसीत १५ कंपन्यांचे सुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्येक कंपनीतील कामगारांना प्रशिक्षण दिले जात आहे. मॉकड्रिल एक प्रशिक्षण पद्धत आहे जिथे वास्तविक परिस्थितीत काय घडेल, याचा सराव केला जातो. त्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीला कामगारांनी कसे सामोरे गेले पाहिजे, याचे मार्गदर्शन मिळत आहे. कामगारांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्येही त्यातून सांगितली जात आहेत. तसेच नुकसान कमी कसे करता याचेही प्रशिक्षण दिले जात आहे.
मूल्यांकनानुसार सुधारणा – आग लागल्यास काय करावे, रासायनिक गळती झाल्यास काय करावे, उपकरणांचे बिघाड झाल्यास काय करावे याचेही प्रशिक्षण आम्ही देत आहोत. मॉकड्रिलच्या शेवटी, कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादाचे मूल्यांकन केले जाते. मूल्यांकनानुसार, मॉकड्रिलमध्ये सुधारणा केली जात आहे, असे भिंताडे यांनी सांगितले.