मे महिन्याचे जेमतेम २ दिवस शिल्लक असून सूर्य आग ओकत आहे. उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असताना हवामान विभागाने मान्सूनसंदर्भात चांगली बातमी दिली आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, केरळमध्ये मान्सून लवकरच दाखल होईल. ७ जूनच्या आसपास मान्सून तळकोकणात पोहोचेल आणि १० किंवा १२ जूनपर्यंत तो मुंबईत दाखल होईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्र आणि मालदीवपर्यंत पोहोचले आहेत. अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
ही स्थिती पाहता केरळमध्ये मान्सून वेळेपुर्वीच पोहोचणे अपेक्षित आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवमार्गे केरळमध्ये धडकणार आहे. कोकण किनारपट्टीला मान्सूनची चाहूल लागली आहे. समुद्र खवळतो आहे. मातीच्या रंगांची फेणी पाण्याला दिसते आहे. त्याआधारे ७ जूनच्या आसपास मान्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईत १० किंवा ११ जूनला मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज आहे. गेल्यावर्षी बिप्परजॉय चक्रीवादळाने मान्सूनचे आगमन २ आठवडे लांबले होते. यावर्षी मात्र मान्सून वेळेवर येतो आहे.