सावंतवाडी शहरातील सुप्रसिद्ध आणि निसर्गसंपन्न मोती तलावाची भिंत मागील ६ ते ७ महिन्यांपासून ढासळली आहे. परंतु, वारंवार निवेदन देऊन, मागणी करून देखील शासन मात्र त्याकडे सफशेल दुर्लक्ष करत आहे. बांधण्यास होणारा विलंब म्हणजे अधिकाऱ्यांचा मुजोरपणाच आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग याची कोणतीच दखल घेत नसल्याने याच्या निषेधार्थ १७ ला तलाव परिसरात सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. तलावाच्या भिंतीचे काम सुरू झाल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत साळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, येथील मोती तलावाची भोसले उद्यान परिसरात भिंत कोसळून गेले सात-आठ महिने उलटून गेले तरी परीस्थित जैसे थेच आहे. त्यामध्ये काहीही डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हा भाग अधिकच खचत चालला आहे. त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी स्थानिकांपासून पर्यटकांपर्यंत सर्वांकडून होत आहे. अनेकांनी त्यासाठी आंदोलने, उपोषणे छेडण्याचा इशाराही दिल्यानंतर निधी अभावी काम रखडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
साळगावकर यांनी याबाबत मी दोन आठवड्यापूर्वी बांधकामच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता कामासाठी निधी प्राप्त झाला असून लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप कोणतीही कारवाई अद्याप पर्यंत करण्यात आलेली नाही. यावरून अधिकाऱ्यांची मुजोरी प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर १७ ला तलाव परिसरात सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे, असे म्हटले आहे. त्यांच्या निर्णयाला माजी नगरसेवक सुरेश भोगटे, राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरसेकर, विलास जाधव, अफरोज राजगुरू, सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव, दिलीप पवार, मनवेल फर्नांडिस, छावा संघटनेचे अध्यक्ष संतोष तळवणकर आदींनी पाठिंबा दिला आहे.