राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट समिट घेण्यात आले. कोकण विभागात ४१६ सामंजस्य करार झाले आहेत. त्यातील ६१ करार रत्नागिरी जिल्ह्यासाठी आहेत. त्या माध्यमातून १ हजार ४०० कोटी गुंतवणूक होऊन ५ हजार ३८३ रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाट यांनी दिली. एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारचे धोरणे आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘इग्नाईट महाराष्ट्र’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शिरसाट म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना तुमच्यापर्यंत पोहचाव्यात, हा एकमेव उद्देश या इग्नाईट कार्यशाळेचा आहे. या कार्यशाळेमध्ये विविध तज्ज्ञ त्यावर मार्गदर्शन करणार आहेत. उत्पादित झालेल्या मालाला निर्यात करण्यासाठी कोणता देश बाजारपेठ मिळवून देऊ शकतो, याची माहिती आज मिळाली. पूजार म्हणाले, केंद्र शासन, राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेऊन गावामध्ये छोटे उद्योजक तयार झाले आहेत. या सर्व योजनांचे रूपांतरण करून एकत्रितपणे गावागावांत कारखाने निर्माण करता येतील का, त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी लवकरच कार्यशाळा घ्यावी.
इग्नाईट २०२४ सारख्या कार्यशाळेतून उद्योजकांना विविध विभागांची चांगली माहिती मिळणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून बँकर्स, विविध विभागांचे प्रतिनिधी, उद्योजक यांचा या निमित्ताने चांगला संवाद घडून येणार आहे. सीएमईजीपी, पीएमईजीपी सारख्या योजनांचे आपल्या जिल्ह्यामध्ये उत्तम काम सुरू आहे. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त इनुजा शेख, मैत्रीचे समन्वय अधिकारी किशोर गिरोल्ला, फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनच्या रिशू मिश्रा, सीडीबीचे मनोज डिंगरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, गजानन करमरकर आदी उपस्थित होते.