25.8 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeChiplun२९ ऑगस्टला खा. शरद पवार चिपळुणात, प्रचाराचा नारळ फोडणार?

२९ ऑगस्टला खा. शरद पवार चिपळुणात, प्रचाराचा नारळ फोडणार?

चिपळूणमध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवारपक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार २९ ऑगस्ट रोजी चिपळूणमध्ये येत आहेत. यावेळी पक्षाचा मेळावा देखील होणार असून या मेळाव्याची जय्यत अशी तयारी करण्यात येत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची चर्चा देखील ऐकण्यास मिळत आहे. पक्षाचे सुप्रीमो स्वतः चिपळूणमध्ये येत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर चिपळूणचे विद्यमान आमदार शेखर निकम यांनी अजितदादा पवार यांची साथ दिली. साहजिकच चिपळूण व रत्नागिरी- जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले.

चिपळूणमध्ये अजितदादा यांची राष्ट्रवादी भक्कम दिसू लागली. परंतु माजी आ.रमेश कदम यांनी थेट शरद पवार यांना पाठिंबा देत पुन्हा नव्याने पक्ष उभारणीसाठी सुरुवात केली. कालांतराने चिपळूणमधील तरुण उद्योजक वाशिष्ठी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि चिपळूणची राष्ट्रवादी पूर्वीप्रमाणे भक्कम दिसू लागली. नुकतेच प्रशांत यादव यांना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पद देऊन जोमाने कामाला लागा असे आदेश शरद पवार यांनी दिले होते. त्याचवेळी आपण स्वतः चिपळूणमध्ये येत असल्याचा सूचना देखील माजी आमदार रमेश कदम व प्रशांत यादव यांना दिले होते. त्यानुसार आता २९ ऑगस्ट रोजी शरद पवार चिपळूणमध्ये येत असून त्यांचा चिपळूण दौरा निश्चित झाला आहे.

त्या अनुषंगाने चिपळूणमध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे. सकाळी ११ वा. चिपळूणमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील मैदानावर मेळावा होणार असून त्यासाठी प्रचंड मोठा शामीयाना उभारण्यात येत असून माजी आमदार रमेश कदम व प्रशांत यादव स्वतः संपूर्ण नियोजन करत आहेत. हा मेळावा असला या मेळाव्याला जाहीर सभेचे स्वरूप येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तयारी करण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्षाचे कार्यकर्ते देखील मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच या सभेच्या माध्यमातून शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची चर्चा देखील ऐकण्यास मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular