कोरोनाच्या महामारीमुळे सर्व जनतेचा जीव टांगणीला लागलेला असताना, त्यानंतर उद्भवणाऱ्या नवीन संकटाची लक्षणे समोर येत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीना सामोरे जावे लागत आहे. या नवीन आजाराचे नाव आहे म्युकर मायकॉसिस. म्युकर मायकॉसिस म्हणजे एक प्रकारचा बुरशी सदृश्य आजार. कोरोना मधून बाहेर पडलेल्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीजन्य संसर्ग झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत, अशा रुग्णांना राज्य सरकारकडून मोफत उपचार दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
म्युकर मायकॉसिस (Mucormycosis)
कोरोना मधून बऱ्या झालेल्या रुग्णांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाल्याचे समोर दृश्य आहे. काही रुग्णांमध्ये औषधांमुळे आलेला प्रचंड थकवा, डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. या म्युकर मायकॉसिस आजारामुळे काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्युकर मायकॉसिस काळी बुरशी किंवा ब्लॅक फंगस म्हणूनही ओळखले जाते.
या आजाराच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका हा शरीरामध्ये आधीपासून असणारे सहव्याधी जसे कि, मधुमेह, उच्च-रक्तदाब, हृदयरोग, हायपर टेन्शन असलेल्या लोकांना अधिक जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरीरातील इतर व्याधींमुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्याने कोरोनाचा संसर्ग लगेचं होऊ शकतो. कोरोना संक्रमितांपैकी ६० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण सहव्याधीने ग्रस्त आहेत. त्यापैकी अनेक जण कोरोनामधून सहीसलामत बाहेर पडत असून, त्यांना आता या नवीन आजाराचा सामना करावा लागत आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार नक्की हा आजार काय आहे आणि कोणाकोणाला या आजाराचा जास्त प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो ?
मागील वर्षभरापासून सुरु असलेला कोरोनाचे संकट आणि मागील फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना संसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून जे कोरोनामुक्त झाले आहेत त्या रुग्णांना डोळे आणि नाकामध्ये होणाऱ्या संसर्गामध्ये वाढ झाली आहे. म्युकर मायकॉसिस हा बुरशीमुळे उद्भवणारा आजार असून, त्यावर तज्ज्ञ सांगतात कि, अनेकांना बुरशीच्या संसर्गाचा धोका असतो. सायनसमध्ये नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत ही बुरशी साठून राहू शकते आणि मग हवेच्या माध्यमातून या बुरशीचा प्रसार होतो.
एखाद्या व्यक्तीला जर या आजाराचा संसर्ग झालेला असेल, तर अशा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला त्वरित संसर्ग होण्याची शक्यता असते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
म्युकर मायकॉसिस आजाराची लक्षणं काय आहेत ते पाहूया.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, देशभरात या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, यासाठी रुग्णांनी वेळीच या आजाराची लक्षणं ओळखणं गरजेचं बनले आहे.
- नाकातून रक्त वाहणे.
- मेंदूमध्ये संसर्ग पोहोचल्यास डोकेदुखीची तीव्रता जास्त असते.
- शास्त्रीय भाषेत डबल व्हिजन म्हणजेचं एखादी गोष्ट डबल प्रमाणात दिसणे.
बहुतांशी रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होताना दिसत नाही. पण, ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती आधीच कोरोनामुळे किंवा शारिरीक व्याधींवर दीर्घ काळापासून घेण्यात येणाऱ्या औषधांमुळे कमी होते, त्यांच्यासाठी ही बुरशी नक्कीच घातक ठरू शकते. तज्ञांच्या मते या बुरशीच्या आजाराची लक्षणे वेळीच ओळखून योग्य उपचार पद्धतीचा अवलंब सुरु करावा.