मिऱ्या – नागपूर महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी जाण्यासाठी मोठ्या मोऱ्या उभारण्यात आल्या आहेत. काही मोऱ्यांचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. पानवळ येथील मोरीमध्ये पहिल्याच पावसात सर्व माती मोरीत जाऊन चिखल साचून राहिला आहे. अनेक मोऱ्यांची ही परिस्थिती आहे. रस्त्यांवर माती आल्याने रस्ते पण निसरडे आणि चिखलमय झाले आहेत. महामार्गावर पावसाळ्यात या नव्या समस्यांना वाहनधारकांना आणि स्थानिकांना सामोरे जावे लागत आहे. ठेकेदारही जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
या मोऱ्या पाणी जाण्यासाठी करण्यात आल्या आहेत. मात्र, चौपदरीकरणाचा रस्ता हा उंच झाल्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. या मोऱ्या बंदिस्त असणे आवश्यक आहेत. भल्या मोठ्या मोऱ्यांमध्ये अनेक वेळा गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून मोऱ्यांमधून पाण्याचा निचरा झालेला नाही. पहिल्या पावसातच या मोऱ्यांमध्ये पाणी साचून राहिले आहे. माती वाहून गेल्याने चिखलाने मोऱ्या भरल्यासारखे झाल्या आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम आणि कटिंग केलेली माती रस्त्यावर आली आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये रस्ते चिखलमय बनले आहेत. भविष्यात पावसात महामार्गावरील प्रवास अतिशय खडतर आणि चिखलमय होणार नाही, याची महामार्ग प्राधिकरणाने घेण्याची गरज आहे.