कोल्हापूर येथील तो सोनार दिल्लीहून ऑनलाईन दागिने मागवत होता. वेगवेगळ्या डिझाईनच्या दागिन्यांना सोन्याचा मुलामा देऊन रत्नागिरीतील दोघांना हाताशी धरून त्याने पतसंस्था, बँकांमध्ये गहाण ठेवून कर्जाद्वारे सुमारे साडे ३ कोटींची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामधील सोनाराला तोळ्याला २० हजार तर उर्वरित २५ हजार दोन साथीदारांना मिळत होते, या पद्धतीने कोट्यवधींची माया या चौकडीने गोळा केल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेमार्फत राजापुरतील एका जबरी चोरीची चौकशी सुरू असताना नकली सोन्याद्वारे कर्ज काढून पतसंस्था, बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांच्याकडून अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत. कोल्हापूर येथील सोनार अमोल पोतदार यांच्यासह त्यांचे साथीदार योगेश सुर्वे (रा. तुळसंदे), अमेय पाथरे (पावस) व प्रभाकार नाविक या चौघांना संशयित म्हणून अटक केली आहे. अमोल पोतदार या सोनाराचा हा फंडा आहे. त्याने दिल्लीहून ऑनलाईन नकली दागिने मागविले. या नकली दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देऊन खरे असल्याचे भासविले. परंतु त्याची विक्री करायची कशी, असा प्रश्न होता.
परंतु त्याला योगेश सुर्वे, अमेय पाथर, नाविक याची साथ मिळाली. त्यांच्यामार्फत हे नकली दागिने पतसंस्था आणि बँकामध्ये गहाण ठेवले. वर्षभरात सुमारे ३०० तोळे दागिने गहाण ठेऊन साडेतीन कोटी रुपये त्यांनी कर्ज उचलल्याचे तपासात पुढे आले आहे. यामध्ये सोनाराने प्रत्येक तोळ्यामागे २० हजार रुपये ठेवून उर्वरित पैसे या तिघांमध्ये वाटले.
सुरक्षेबाबत आरबीआयचे नियम पाळा – जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सर्व पतसंस्थाचालकांची महत्त्वाची बैठक आज झाली. यामध्ये प्रामुख्याने सोने किंवा पैशांच्या सुरक्षेबाबत संस्था अपेक्षित खबरदारी किंवा सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचे समजते. त्यामुळे आरबीआयच्या निकषानुसार संस्था किंवा बँकांनी सुरक्षा व्यवस्था करावी, अशी ताकीद कुलकर्णी यांनी संस्थाचालकांना दिली आहे.