गुहागर- विजापूर राष्ट्रीय मार्गावर सध्या ‘होडी’ प्रवासाचा ‘अजब’ अनुभव येऊ लागला आहे. गणेशोत्सवासाठी चिपळूण व गुहागर तालुक्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांनाही त्याचा फटका बसत आहे. मिरजोळी-उक्ताड दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांतून ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ सहन करावा लागत आहे. दीड-दोन फुटांचे खड्डे अन् चिखलाचे साम्राज्य या दुहेरी संकटाशी सामना करावा लागत असल्याने संतापलेले गणेशभक्त अधिकाऱ्यांच्या नावाने अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत आहेत. चिपळूण-गुहागर मार्गावरील मिरजोळी-साखरवाडी-उक्ताड दरम्यानच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
येथील काही भागातील डांबरी रस्ताच गायब झाला आहे. या ठिकाणी जीवघेण्या खड्क्यांनी अक्षरशः वाहनचालक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथे वारंवार अपघात घडत आहेत. मिरजोळी सरपंच कासमभाई दलवाई, पंचक्रोशीतील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नांनी या मार्गावरचे खड्डे दगड-मातीने भरून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातुरमातूर उपाययोजना केली. पाऊस थांबल्यानंतर या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येईल, या भूमिकेवर ते अधिकारी आजही ठाम आहेत.
मात्र पाऊस काही केल्या थांबत नाही आणि येथील खड्डयांचा प्रश्न काही निकाली निघत नाही, अशीच काहीशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गेले चार ते पाच वर्षे पावसाळ्यात येथील मार्गाची दयनीय अवस्था होते. वर्षभर त्याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना पावसाळ्यात जाग येते आणि जोपर्यंत नागरिकांमधून ओरड होत नाही तोवर काहीच हालचाली होत नाहीत. आजपर्यंतचा हाच अनुभव स्थानिकांचा आहे. गणेशोत्सवात रस्त्यांवरचे खड्डे भरून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करा, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी आमसभेत दिल्या होत्या. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना येथील रस्ता सुस्थितीत करण्याची सवड मिळालेली नाही.