रत्नागिरी जिल्ह्यातील सुरु असेलेले महामार्गाचे काम अनेकांसाठी धोक्याचे ठरत आहे. खेड तालुक्याच्या हद्दीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज ही कंपनी करत आहे. एकूण ४४ किलोमीटरच्या कामापैकी ३६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम मात्र धीम्या गतीने सुरु आहे. मात्र काम करताना ठेकेदाराने योग्य त्या ठिकाणी डायव्हर्शन न ठेवल्याने कोणीही कुठेही गाड्या वळवत असल्याने या परिसरात वारंवार अपघात होऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे, काही ठिकाणची कामे महामार्गाच्या मधीही रेंगाळल्याने महामार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनू लागला आहे.
भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवर मागे बसलेली तरुणी डंपरच्या टायरखाली येऊन जागीच गतप्राण झाली आहे. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर लोटेमाळ येथे सायंकाळी ७ च्या दरम्यान घडला. दुचाकीला धडक देणारा डंपर हा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका घेतलेल्या कल्याण टोलवेज या कमानीच्या मालकीचा असून अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण करताना योग्य डायव्हर्शन न ठेवल्याने या परिसरात वारंवार अपघात होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून अपघात झाल्यावर पळून गेलेला डंपर चालक जो पर्यंत समोर येत नाही तो पर्यंत तरुणीचा मृतदेह उचलू देणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला असल्याने येथील वातावरण तंग झाले आहे.
घटनास्थळावरुन प्राप्त माहितीनुसार ताजबुद्दीन परकार हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन रुकसार चौगुले हिच्या सोबत किराणा मालाच्या दुकानात गेला होता. किराणा सामान खरेदी केल्यावर ते दुचाकीवरून घराकडे जाण्यासाठी निघाले असता चिपळूण दिशेकडून खेडकडे भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली रुकसार ही खाली पडली आणि डंपरच्या टायरखाली जाऊन चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू ओढावला.
येथील स्थानिक नागरिकानी सांगितल्याप्रमाणे, कल्याण टोलवेज या कंपनीच्या वाहनावरील चालक हे वाहने हाकताना अतिशय बेदरकारपणे हाकत असल्याने या आधीही अपघात घडलेले आहेत.